चिपळूण नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी ७ उमेदवार तर नगरसेवक पदासाठी ११० उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीमध्ये ५ राजकीय पक्ष तर २ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तसेच नगरसेवक पदाच्या ११० उमेदवारांमध्ये ९१ उमेदवार पक्षाचे तर १९ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकंदरीत नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी किती उमेदवार रिंगणात आहेत हे स्पष्ट झाले आहे.
चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी १३ तर नगरसेवक पदासह १५४ नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. यामध्ये अर्ज छाननी दरम्यान नगराध्यक्ष पदासह १२९ नामनिर्देशन पत्र वैध ठरले. तर ८ नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र वैध ठरले. शुक्रवार दि. २१ रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाचे कोण उमेदवार मागे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
अखेर शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ९ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. यामध्ये इशरत गोठे (शिवसेना उबाठा), श्रीराम शिंदे, रिजवान सुर्वे, नईम खटीक (अपक्ष), सुनील खेडेकर (काँग्रेस), सीमा रानडे (अपक्ष), भक्ती कुबडे (शिवसेना उबाठा), मृणाल घटे (भाजपा), महेंद्र सावंत (अपक्ष) यांचा समावेश आहे. तर यापूर्वी नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे मिलिंद कापडी यांनी गुरूवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ७ उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी राहिले होते. तसेच नगरसेवक पदासाठी अमृता कोंडविलकर व तेजस्वी किंजळकर असे दोन उमेदवार यांनी अर्ज मागे घेतले. शुक्रवारपर्यंत १२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. तर शुक्रवारी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज कोण मागे घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, कोणीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. यामुळे नगराध्यक्ष पदासाठी उमेश सकपाळ (शिवसेना), राजेंद्र देवळेकर (शिवसेना उबाठा), सुधीर शिंदे (काँग्रेस), रमेश कदम (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), निशिकांत भोजने व लियाकत शाह (अपक्ष), मोईन पेचकर (समाजवादी पार्टी) असे ७ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.







