चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीत मी थेट सहभाग घेत नाही. सिंधुदुर्ग ते चिपळूणपर्यंतची जबाबदारी माजी खासदार विनायक राऊत यांच्याकडे असून, एबी फॉर्मदेखील माझ्याकडे आलेले नाहीत,” असे प्रतिपादन शिवसेना नेते व आमदार भास्कर जाधव यांनी केले. मात्र, महाविकास आघाडीच्या बैठका आणि निर्णयप्रक्रिया ठप्प असल्याने, पक्षातील काही पदाधिकारी तसेच माजी आमदार रमेश कदम यांच्या विनंतीवरून आपण या प्रक्रियेत लक्ष घातल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शनिवारी दुपारी आमदार जाधव यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडीच्या वतीनेच निवडणुकीत काम करण्याचा निर्णय जाहीर केला. “आम्ही जिथे उमेदवार दिले आहेत तेथे प्रचार करू; जिथे उमेदवार नाहीत, तेथे जाणार नाही,” असे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला आघाडीचे उमेदवार रमेश कदम उपस्थित होते.
आमदार जाधव पुढे म्हणाले, “नगराध्यक्षपदी आमच्या पक्षातून कोणी तयार नव्हते. काँग्रेससोबत बोलणी सुरू होती. नंतर कदम यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार जागावाटणी ठरली. परंतु ही चर्चा अर्धवट राहिली. उमेदवारी अर्जाची अंतिम वेळ जवळ आली तरी आमच्या पक्षातील काही लोकांनी स्वतःला दूर ठेवले. अखेर कदम यांनी काही जागा वाटून घेतल्या आणि त्यामुळेच ही आघाडी आकाराला आली.”
यामुळे आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार रमेश कदम यांची आघाडी अधिकृतपणे दृश्यमान झाली आहे.
यावेळी आमदार जाधव यांनी आणखी एक महत्त्वाचे विधान केले —
“आमदार शेखर निकम यांनी आम्हाला पाठिंबा दिल्यास, तो आम्ही स्वीकारू.”
चिपळूण नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत समन्वयाचा अभाव, तसेच जाधव–कदम युतीचे नवे समीकरण आता स्पष्टपणे पुढे आले आहे.







