सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी जोरदार प्रचार मोहीम हाती घेतली असून शहरभर त्यांचा प्रचार वेगाने झेपावत आहे. सावंतवाडी राजघराण्याच्या सुनबाई प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने या निवडणुकीची उत्सुकता आणि महत्त्व अधिक वाढले आहे.
उमेदवार सौ. श्रद्धाराजे भोसले आणि त्यांचे पती युवराज लखमराजे भोसले यांनी गेल्या काही दिवसांत संपूर्ण शहर पालथे घातले आहे. घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत, स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या अडचणी आणि भाजपच्या विकासनिश्चितीबाबत संवाद साधत त्यांनी प्रचाराची गती वाढवली आहे.
यासोबतच, श्रीमंत खेम सावंत भोसले आणि सौ. शुभदादेवी भोसले हेही राजघराण्याचे प्रतिनिधी म्हणून मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधत आहेत. राजघराण्याचे चारही मान्यवर गल्लोगल्ली फिरत असल्याने प्रचार मोहिमेला अनोखी गतिमानता मिळाली असून, शहरात राजघराण्याच्या परंपरेचा आणि राजकीय नवउत्साहाचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत आहे.
सावंतवाडी शहरातील विविध भागात चाललेल्या या प्रचार दौऱ्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त आणि मनापासून प्रतिसाद मिळत असल्याचे उमेदवारांनीही सांगितले. महिलांचा, तरुणांचा आणि व्यावसायिक वर्गाचा विशेष पाठिंबा मिळत असल्याचे भाजप कार्यकर्तेही सांगत आहेत.
सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या लढतीत श्रद्धाराजे भोसले यांची उमेदवारी हा लोकांमध्ये चर्चेचा प्रमुख विषय बनला असून, त्यांच्या प्रचार मोहिमेमुळे शहरातील निवडणुकीचे वातावरण अधिक रंगतदार झाले आहे.







