मालवण : (प्रतिनिधी)
मालवण शहरातील एसटी स्टॅन्ड नजिक असलेल्या श्री राम मंदिरात श्री गजानन महाराज (शेगाव) यांचा प्रकटदिन सोहळा शनिवार दि. ८ फेब्रुवारी रोजी भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेत गजानन विजय ग्रंथाचे साखळी पारायण होणार आहे. सकाळी ८ वाजता श्री गजानन महाराजांची महापूजा, दुपारी १२ वाजता महाआरती व नैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते ३ या वेळेत भाविकांसाठी झुणका-भाकरी प्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
सायंकाळी ५ वाजता भक्ती संगीत कार्यक्रम ‘स्वरसंध्या’ होणार असून प्रसिद्ध गायक अॅड. दिलीप ठाकुर (संगीत अलंकार) हे भक्तिगीते सादर करणार आहेत. सायंकाळी ७ वाजता श्री गजानन महाराजांचा प्रकटदिन देखावा सादर केला जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळातर्फे ‘कृष्ण–सुदामा भेट’ हा नाट्यप्रयोग रंगणार आहे.
या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन गजानन महाराज (शेगाव) भक्त मंडळ, मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.








