मालवण | प्रतिनिधी :
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया, आदिशक्ती आई भवानी माता आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्मृतींना उजाळा देणाऱ्या ऐतिहासिक, पारंपरिक त्रैवार्षिक किल्ले सिंधुदुर्ग भेट सोहळ्यासाठी कांदळगावचे ग्रामदैवत श्री स्वयंभू देव रामेश्वर शुक्रवार, २३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता कांदळगाव येथून किल्ले सिंधुदुर्ग, मालवण येथे रवाना होणार आहेत. वारेसुत्र, पालखी, तरंग, राणे–परब मानकरी, गावघर व स्थत मंडणासह हा सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक व देदीप्यमान सोहळ्यात सहकुटुंब सहभागी होऊन साक्षीदार व्हावे, असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ व कांदळगाव ग्रामस्थांनी केले आहे.
दि. २३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता श्री देव रामेश्वर आपल्या पंचायतन, वारेसुत्र, पालखी, तरंग व भाविक रयतेसह मालवण जोशी मांड येथे मार्गस्थ होतील. दुपारी १२ वाजता जोशी मांड मेढा येथे उपस्थितांसाठी अल्पोपहारानंतर समुद्रमार्गे होडीतून किल्ले सिंधुदुर्ग येथे प्रस्थान होईल. किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरात श्री देव रामेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक भेट सोहळा, त्यानंतर भवानी माता मंदिरात आदिमाया, आदिशक्ती आई भवानी यांच्याशी भेट सोहळा व पारंपरिक रितीरिवाज पार पडतील. सायंकाळी ४ वाजता दांडेश्वर मंदिर, दांडी येथे होडीतून परतीचा प्रवास होईल. दांडी येथे पोहोचल्यानंतर दांडी गावातर्फे चहापाणी व शीतपेय वाटप करण्यात येणार असून, त्यानंतर मौनीनाथ मंदिर-मेढा मार्गे रात्री मुक्काम होईल. मौनीनाथ मंदिर व कुशेवाडा येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, २४ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता मौनीनाथ मंदिरात विधीवत पूजा-अर्चा झाल्यानंतर भाविकांना आशीर्वचन देऊन पालखी कुशेवाडा येथे मार्गस्थ होईल. कुशेवाडा येथे प्रकाश कुशे यांच्या निवासस्थानी पारंपरिक भेट व रितीरिवाज पूर्ण करून पालखी रामेश्वर मांड, मालवण बाजारपेठ येथे दाखल होईल. दुपारी १ वाजता रामेश्वर मांड येथे दर्शन व आशीर्वचन, तसेच रामेश्वर मांड मंडळातर्फे उमेश नेरुरकर यांच्या निवासस्थानी व भंडारी हायस्कूलमागील हॉलमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ नंतर रात्री ८ वाजता कोळंब येथील देव महापुरुष देवस्थान (मांगरी) येथे पालखी व तरंगांचे विसर्जन व मुक्काम होईल. गणेश (अवि) नेरकर यांच्या निवासस्थानी महाप्रसाद देण्यात येणार असून, कांदळगावला जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत वाहनांची सोय करण्यात आली आहे.
रविवार, २५ जानेवारी रोजी दुपारी १ व रात्री १० वाजता कोळंब महापुरुष देवस्थान येथे महाप्रसादानंतर आशीर्वचन देत श्री देव रामेश्वर, वारेसुत्र, पालखी, तरंग, भाविक व गावघर कांदळगावकडे स्वगृही परतीच्या प्रवासाला निघणार आहेत. वाटेत आशीर्वचन देत रामेश्वर मंदिर, कांदळगाव येथे या ऐतिहासिक तीन दिवसीय सोहळ्याची सांगता होईल, अशी माहिती देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये विश्वस्त मंडळ, मानकरी व ग्रामस्थांनी दिली आहे.







