सिंधुदुर्गनगरी :
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्ह्यातील ५० जिल्हा परिषद गट व १०० पंचायत समिती गणांसाठी एकूण ५ लाख ९९ हजार ५६४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुका पारदर्शक, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी दिली.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या की, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व समित्यांचे गठन करण्यात आले असून आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून या समित्या कार्यरत आहेत. जिल्ह्यात १४ हजार १५३ दुबार मतदार असून आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नियोजनबद्धरीत्या राबविण्यात येणार आहे. उमेदवारांना आवश्यक परवानग्या सुलभरीत्या मिळाव्यात यासाठी एक खिडकी योजना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून खर्च नियंत्रण, तक्रार निवारण, ईव्हीएम व्यवस्थापन तसेच आचारसंहिता अंमलबजावणीसाठी स्वतंत्र समित्या कार्यरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनानेही आवश्यक ती खबरदारी घेतल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी कायदा व सुव्यवस्था, सुरक्षा उपाययोजना तसेच प्रतिबंधात्मक कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार FST (फ्लाइंग स्क्वॉड टीम) व SST (स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम) तैनात करण्यात आल्या असून, निवडणूक काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सतत सजग राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
१६ ते २१ जानेवारीदरम्यान नामनिर्देशन अर्ज
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज १६ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत.
तालुकानिहाय नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे –
वैभववाडी (पंचायत समिती सभागृह), कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी व दोडामार्ग (संबंधित तहसीलदार कार्यालये).
मतदारसंख्या व प्रशासकीय तयारी
अंतिम मतदार यादीत ३,०१,९०३ पुरुष, २,९७,६६० महिला व १ इतर मतदार असा समावेश आहे. निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तालुकानिहाय निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
सीमावर्ती भागात कडक नजर
गोवा सीमावर्ती भागासह जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर १० तपासणी नाके (चेक पोस्ट) कार्यान्वित करण्यात आले असून शस्त्र परवाने तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर पोलीस प्रशासनाची करडी नजर ठेवण्यात येत आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी स्पष्ट केले.
शांततापूर्ण, निर्भय आणि पारदर्शक निवडणूक पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.






