मालवण (प्रतिनिधी):
मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिर यांच्या वतीने आयोजित तसेच कै. श्रीपाद वाघ पुरस्कृत कै. राजाभाऊ भोसले स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला दत्त मंदिर, भरड (मालवण) येथे पार पडणार आहे.
या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प शुक्रवार, दि. १७ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता गुंफले जाणार असून, “मोगल मर्दिनी क्षत्राणी शिवस्नुषा ताराराणी” या विषयावर प्रसिद्ध इतिहास अभ्यासक डॉ. सौ. ज्योती बुवा-तोरसकर यांचे व्याख्यान होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेतील तेजस्वी व्यक्तिमत्त्व असलेल्या राजमाता ताराराणी यांच्या शौर्य, नेतृत्व व राष्ट्रनिष्ठेवर आधारित हे व्याख्यान ऐकण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. या व्याख्यानासाठी मालवण परिसरातील इतिहासप्रेमी, विद्यार्थी, महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.








