रत्नागिरी | आगामी रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन महिला उमेदवारांमध्ये थेट सामना रंगणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून सौ. शिवानी सावंत – माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याच वेळी शिवसेना (शिंदे गट) कडून महायुतीच्या उमेदवार म्हणून सौ. शिल्पा प्रशांत सुर्वे यांनी देखील नामांकन दाखल केले आहे.
या दोन्ही उमेदवारांच्या प्रवेशामुळे रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठीची निवडणूक आता अधिकच रोचक होण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन प्रमुख आघाड्यांमध्ये थेट मुकाबला होणार असल्याने मतदारांच्या उत्सुकतेला उधाण आले आहे.
सौ. शिवानी सावंत – माने या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या स्थानिक नेतृत्वातून पुढे आलेल्या असून महिलांच्या सशक्तीकरणासाठी सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. नामांकन दाखल करताना महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याउलट सौ. शिल्पा प्रशांत सुर्वे या शिवसेना (शिंदे गट) तर्फे महायुतीच्या उमेदवार असून, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि पक्षाच्या धोरणांना पुढे नेणारी उमेदवार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे महायुतीकडूनही जोरदार निवडणूक प्रचाराची तयारी सुरू असल्याचे बोलले जाते.
उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता प्रचाराची रणधुमाळी अधिकच रंगणार असून, शहराच्या विकासाचा रोडमॅप, महिला नेतृत्वाचे प्रश्न आणि दोन्ही गटातील अंतर्गत समीकरणे या सर्वच गोष्टींचा प्रभाव या निवडणुकीवर दिसून येणार आहे.







