रत्नागिरी | आगामी रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकीकडे महायुतीच्या प्रचंड गाजावाजा होत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून वहिदा बशीर मुर्तुजा यांना उमेदवार म्हणून पुढे केले आहे. त्यांनी अधिकृतरीत्या उमेदवारीचा अर्ज दाखल करून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली.
वहिदा मुर्तुजा या रत्नागिरी शहरातील स्थानिक आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या उमेदवारीमुळे रत्नागिरीच्या स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची निर्मिती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
नामांकन दाखल करताना पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर बोलताना वहिदा मुर्तुजा म्हणाल्या, “रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक आणि जबाबदार नेतृत्व देणे हे माझे ध्येय आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहीन.”
यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून महिलांचे नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न दिसून येत असल्याची चर्चा सुरु आहे. रत्नागिरीमध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक त्यामुळे अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.







