स्थानिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर एक सुरु असलेली चर्चा म्हणजे राजकीय पक्ष बहुतेकदा केवळ मतदारसंख्येवर आधारित ‘विजयी शक्यता’ हा एकच निकष गृहीत धरून उमेदवारी देतात. यामुळे मतदारांना “कमी वाईट” पर्याय निवडण्याची वेळ येते, असा सूर काही जाणकार नागरिक आणि मतदारांमधून ऐकू येतो. उच्च शिक्षण घेतलेले किंवा व्यावसायिक पार्श्वभूमी असलेले लोक निवडणूक क्षेत्रापासून दूर राहतात किंवा त्यांच्या सहभागाला आजचे राजकारण अनुकूल नसल्याचेही मत प्रचलित आहे.
मात्र या वातावरणात, मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून माजी आमदार वैभव नाईक यांनी पारंपरिक विचारांना छेद देत सुशिक्षित, व्यावसायिक आणि सामाजिक भान असलेल्या उमेदवारांची निवड केल्याने लक्ष वेधले आहे.
उमेदवार निवडीत शिक्षण आणि व्यवसायावर भर
वैभव नाईक यांनी जाहीर केलेल्या उमेदवारी यादीत २ वकील, १ एमबीए, १ द्विपदवीधर, ८ पदवीधर आणि २ पदविकाधारक अशा उच्चशिक्षित व्यक्तींचा समावेश आहे. एकूण २१ उमेदवारांपैकी तब्बल १४ जण उच्चशिक्षित असून त्यांच्या हातात विविध व्यावसायिक अनुभवही आहे.
अनेकांनी पर्यटनाशी संबंधित व्यवसाय, वकिली, विमा सेवा, पिग्मी एजंट, बांधकाम व्यवसाय, किरकोळ दुकाने, आंबा बागायत, मच्छीमारी तसेच अन्य स्वरोजगारातून स्वतःचा आणि कुटुंबाचा चरितार्थ चालवला आहे. श्रमजीवी महिलांचाही यात समावेश आहे.
सुशिक्षित आणि सामाजिक कार्याचा संगम
मालवण-कुडाळ मतदारसंघात तब्बल दोन दशकं जनसंपर्क आणि स्थानिक राजकारणाची पकड असलेले वैभव नाईक यांनी प्रचलित राजकीय निकष बाजूला ठेवून “उत्कृष्ट शिक्षण + सामाजिक बांधिलकी + व्यवसाय” या त्रिसूत्रीवर उमेदवारांची निवड केली आहे.
याचा प्रतिसाद मालवणकरांमध्ये सकारात्मक दिसत असून, मतदारांच्या चर्चेत “योग्य, शिक्षित आणि स्वयंरोजगार करणारे उमेदवार” असा उल्लेख वारंवार होतो आहे.
पुढच्या पिढीच्या राजकारणासाठी नवीन दिशादर्शन
जर मालवणची जनतेने या लढतीत सुशिक्षित टिमला स्वीकारले तर हे सिंधुदुर्गसह कोकणाच्या राजकारणात एक नवा पायंडा पाडू शकते. इथून पुढे सर्वच पक्षांना उमेदवारी देताना ‘गावगुंड’ नव्हे, ‘गावगौरव’ उमेदवार निवडावा लागेल असा जनतेचा आग्रह अधिक बळकट होईल.
मालवणमधील मतदारांच्या पसंतीने हे यशस्वी बनले, तर पुढील जन्मात राजकारण हा उच्चशिक्षित तरुणांसाठीही आकर्षक आणि स्वच्छ पर्याय ठरू शकेल – अशी आशा राजकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे.







