मालवण हे पर्यटन शहर असल्यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. परिणामी शहरात कचरा निर्मितीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढते. पर्यटन शहराची स्वच्छता अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने तसेच व्यापारी व हॉटेल व्यावसायिकांच्या सोयीसाठी मालवण नगरपरिषदेने बाजारपेठ व शहरातील काही महत्त्वाच्या भागांमध्ये रात्री कचरा संकलन मोहिमेस सुरुवात केली आहे.
शहरातील काही प्रमुख ठिकाणी तसेच समुद्रकिनाऱ्यावर उघड्यावर कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आल्याने नगरपरिषदेने हा निर्णय अंमलात आणला आहे. फोवकांडा पिंपळ परिसरापासून रॉक गार्डन व चिवला समुद्रकिनारा या भागात रात्रीचे कचरा संकलन सुरू करण्यात आले आहे.
घनकचरा व्यवस्थापन अधिनियमानुसार उघड्यावर कचरा टाकणे हा दंडनीय गुन्हा आहे. अशा प्रकारे कचरा टाकल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते, परिसर विद्रूप होतो तसेच नागरिक व प्राण्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. नागरिकांवर होणारे अस्वच्छतेचे दुष्परिणाम आणि शहराच्या नैसर्गिक सौंदर्यावर होणारे परिणाम लक्षात घेता सर्व नागरिकांनी आपला कचरा उघड्यावर न टाकता नगरपरिषदेच्या घंटागाडीतच देणे आवश्यक आहे.
मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. प्रतीक थोरात यांनी सांगितले की, रात्रीच्या कचरा संकलनासोबतच या भागात दिवसा देखील कचरा संकलन सुरू ठेवण्यात येणार आहे. मालवण हे पर्यटन शहर असल्याने पर्यटनवृद्धीसाठी स्वच्छतेवर विशेष भर देणे अत्यावश्यक आहे. यासाठी नागरिक व व्यावसायिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असून, शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.







