मालवण : (प्रतिनिधी) मालवण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवडून आलेल्या नगरसेवकांनी एकत्र येत अधिकृतपणे ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण नगरपरिषद गट’ स्थापन केला आहे. या गटाच्या गटप्रमुखपदी नगरसेवक महेंद्र सुदाम म्हाडगुत यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
गटस्थापनेबाबतचे अधिकृत पत्र नगरविकास विभागाकडे सादर करण्यात आले असून, यावेळी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर, अनिता गिरकर यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यासंदर्भात बोलताना नगरसेवक मंदार ओरसकर यांनी सांगितले की, मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणूनच निवडणूक लढवली असून जनतेने आम्हाला निवडून दिले आहे. त्यामुळे नगरपालिकेत गट स्थापन करताना पक्षाच्या नावानेच गट स्थापन करण्यात आला आहे.
महेंद्र म्हाडगुत हे निष्ठावान शिवसैनिक असून त्यांना नगरपालिकेतील कामकाजाचा अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गट शहराच्या विकासासाठी, नागरिकांच्या प्रश्नांसाठी आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर नगरपालिकेत ठाम व आग्रही भूमिका घेईल, असेही ओरसकर यांनी स्पष्ट केले.
मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उबाठा शिवसेनेचा नगरपरिषद गट सक्रियपणे काम करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.






