मालवण (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन बुधवार दि. ७ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मसके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन सिंधुदुर्ग वाचन मंदिर, तारकर्ली आणि अखिल तारकर्ली ग्राम विकास मंडळ, मुंबई (तारकर्ली) यांच्या संयुक्त विद्यमाने ब्लू हेवन रिसॉर्ट, तारकर्ली येथे संपन्न होणार आहे.
अधिवेशनाच्या प्रथम सत्रात सकाळी ९.३० ते १० वाजता श्री महापुरुष मंदिर, तारकर्ली ते ब्लू हेवन रिसॉर्ट अशी ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० ते १०.३० वाजता प्रतिनिधी नोंदणी, परिचय व अल्पोपहार होईल. सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत अधिवेशनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार असून उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप जनार्दन ढवळ उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, तारकर्ली सरपंच सौ. मृणाली मयेकर, तर स्वागताध्यक्ष म्हणून सिंधुदुर्ग वाचन मंदिर, तारकर्ली अध्यक्ष कांचन खराडे यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे पुरस्कार वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
द्वितीय सत्रात दुपारी २ ते ३.३० वाजता ग्रंथालय कर्मचारी व पदाधिकारी तसेच डॉ. दत्ता सामंत न्यू इंग्लिश स्कूल, देवबाग यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून यामध्ये दशावतार, नाट्य अभिवाचन, प्रहसन व समूह नृत्ये यांचा समावेश असेल. दुपारी ३.३० ते ४.३० वाजता होणाऱ्या खुल्या अधिवेशनात ग्रंथालयांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. या खुल्या अधिवेशनाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सचिन हजारे (जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सिंधुदुर्ग) मार्गदर्शन करणार आहेत. अधिवेशनाची सांगता पसायदानाने होणार आहे.
या वार्षिक अधिवेशनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मसके यांनी केले आहे.






