मुंबई : शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी स्थापन करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबरोबरच आदित्य ठाकरे यांची न्यासाच्या सदस्यपदीही नियुक्ती झाली आहे.
२०१९ साली मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. तब्बल सहा वर्षांनंतर त्यांची पुन्हा या पदावर नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत जाहीर करण्यात आली.
शिवाजी पार्क येथील महापौर बंगला बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी निवडण्यात आल्यानंतर २०१६ साली समितीच्या स्थापनेवेळी उद्धव ठाकरे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सामान्य प्रशासन विभागाकडून या नियुक्तीची कार्यवाही पूर्ण झाली असून याबाबत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी समाधान व्यक्त केले. त्या म्हणाल्या,
“सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुंस्कृत विचारांचे आहेत. आमचे आणि त्यांचे कितीही राजकीय मतभेद असले तरी ते सुंस्कृत असे नेते आहेत. सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो आणि त्याचा आनंद आहे.”
📌 महत्वाचे मुद्दे
उद्धव ठाकरे पुन्हा अध्यक्षपदी
आदित्य ठाकरे सदस्यपदी
२०१९ मध्ये दिलेला राजीनामा – आता सहा वर्षांनी पुनर्नियुक्ती
फडणवीस यांच्या आदेशानुसार नियुक्ती जाहीर
ही पुनर्नियुक्ती शिवसेना आणि ठाकरे गटासाठी महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड मानली जात आहे.






