राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच कल्याण–डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) निवडणुकीत भाजपने खाते उघडले आहे. निवडणूक प्रचाराला सुरुवात होण्याआधीच भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
डोंबिवलीतील आसावरी केदार नवरे आणि कल्याणमधील रेखा चौधरी या भाजपच्या उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवला असून, त्यामुळे केडीएमसी निवडणुकीत भाजपला सुरुवातीलाच मोठा दिलासा मिळाला आहे.
डोंबिवलीतील आसावरी केदार नवरे यांनी पॅनल क्रमांक 26 (क) मधून खुल्या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने त्यांची निवड बिनविरोध जाहीर झाली.तर कल्याणमधील रेखा चौधरी यांनी पॅनल क्रमांक 18 (अ) मधून बिनविरोध विजय मिळवला आहे.
यंदाच्या कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. मात्र, यावेळी राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झाले आहेत. केडीएमसीमध्ये एकूण 122 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
महायुती (भाजप + शिवसेना शिंदे गट) मध्ये शिवसेना (शिंदे गट) – 66 जागांवर लढणार तर भाजप – 56 जागांवर निवडणूक लढवणार आहे. दुसरीकडे अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडला असून ते 42 जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत.
मनसे + शिवसेना (ठाकरे गट) आघाडीमध्ये मनसे – 54 जागांवर निवडणूक लढवत असून शिवसेना (ठाकरे गट) – 68 जागांवर आपले नशीब आजमावत आहे.
प्रचार सुरू होण्याआधीच भाजपच्या दोन उमेदवारांचा बिनविरोध विजय हा केडीएमसी निवडणुकीतील पहिला राजकीय संकेत मानला जात असून, पुढील काळात ही निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






