मालवण (प्रतिनिधी)
समुद्रात निर्माण झालेल्या कचऱ्यामुळे समुद्रातील जैवविविधता धोक्यात आली असून समुद्राचे संवर्धन करणे आपली सामूहिक जबाबदारी आहे. समुद्र आणि किनारी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पर्यावरण अभ्यासक व वनशक्ती संस्थेचे संचालक स्टॅलिन दयानंद यांनी मालवण येथे आयोजित समुद्ररक्षक संमेलनात केले.
समुद्र संवर्धन, किनारी पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास या विषयांवर व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण, सागरशक्ती (Oceans and People), वनशक्ती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, युथ बिट्स फॉर क्लायमेट, मालवण नगरपरिषद, नीलक्रांती आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “समुद्ररक्षक संमेलन २०२६” शनिवारी दादा शिखरे सभागृह, बॅ. नाथ पै सेवांगण, धुरीवाडा, मालवण येथे संपन्न झाले. प्रारंभी बॅ. नाथ पै आणि ज्ञानेश देऊलकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाडास पाणी घालण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध पर्यावरण अभ्यासक व वनशक्ती संस्थेचे संचालक स्टॅलिन दयानंद व प्रमुख अतिथी म्हणून मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर या उपस्थित होत्या. प्रास्ताविक सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी केले.
यावेळी स्टॅलिन दयानंद यांनी पर्यावरण संवर्धन विषयक विविध विषय व समस्यांवर मार्गदर्शन केले. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात मायनिंग, वाळू उत्खनन, प्लॉटिंग, विविध प्रकल्प, महामार्ग, वृक्षतोड यामुळे पर्यावरणविषयक अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्रकल्पांविरोधात स्थानिकांनी लढा देत सरकारवर दबाव आणला पाहिजे. त्यासाठी अशा प्रकल्पांमुळे होणाऱ्या नुकसानीबाबतचे परिपूर्ण माहिती संकलन करून न्यायालयात तक्रार दाखल केली पाहिजे. यासाठी आवश्यक ती कायदेशीर मदत वनशक्ती संस्थेकडून केली जाईल, असेही स्टॅलिन दयानंद स्टॅलिन म्हणाले.
यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी वनशक्ती व मालवण मधील इतर पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या संस्थांच्या कार्याचे कौतुक करत मालवण शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी मालवण नगरपालिका प्रयत्नशील त्याबाबत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे, असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात ऍड. देवदत्त परुळेकर यांनी निसर्ग वाचवला तर आपण वाचू, समुद्र हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, त्यामुळे पर्यावरण व समुद्र संवर्धनासाठी सर्वांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे सांगितले.
गेली दोन वर्षे वनशक्ती संस्थेच्या पुढाकाराने मालवणच्या समुद्रात राबविलेल्या समुद्रतळ स्वच्छता मोहिमेद्वारे समुद्रातील प्लास्टिक व इतर कचरा काढून सागरी पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आठ स्कुबा डायव्हर्सचा या संमेलनात विशेष गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन सौ. ज्योती तोरसकर यांनी केले. आभार डॉ. सुमेधा नाईक यांनी मानले.







