जिल्ह्यात चालू खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी व दर्जेदार निविष्ठांचा पुरवठा होण्यासाठी कृषि विभागाने जिल्हा भरारी पथकामार्फत कारवाई चा धडाका सुरु केला असून विनापरवाना व बेकायदेशीर रित्या खतांची विक्री करणाऱ्यांवर देवगड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.
भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चांभारघाटी, वाडा ता. देवगड येथे सहा चाकी ट्रक मधून सेंद्रिय खत विनापरवाना गोदामात खाली करत असताना धाड टाकून तपासणी केली असता मे. अष्टविनायक बायो फर्टीलायझर या कंपनीचे नवसंजीवनी सेंद्रिय खत एकूण ४.० मे. टन ५७ हजार ५०० रूपयांचे आढळून आले. या खताबाबत गाडी चालक यांच्याकडे चौकशी केली असता हे खत सत्यवान परशुराम परब रा. वाडा यांनी विनापरवाना विक्री करिता आणल्याचे निष्पन्न झाले. तसेच या खत उत्पादक कंपनीचा उत्पादन व विक्री परवाना नसताना देखील त्यांनी विनापरवाना खताचे उत्पादन व विक्री केल्याचे आढळून आले. हि कृती खत नियंत्रण आदेश १९८५, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ व खत वाहतूक नियंत्रण आदेश १९७३ चे उल्लंघन असल्याने सदरील ४.० मे. टन खत एकूण रक्कम ५७ हजार ५०० रूपये व सहा चाकी ट्रक रक्कम १५.०० लक्ष रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात येऊन देवगड तालुका पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्ती आणि कंपनी वर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात कोणीही अनधिकृत, विनापरवाना किवा चढ्या दराने खते, बियाणे व किटकनाशके विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ कृषि विभागाकडे तक्रार करावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.
सदरची कारवाईमध्ये जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, गोहीम अधिकारी राहुल माने, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुशांत भोसले, देवगडच्या तालुका कृषि अधिकारी आरती पाटील, देवगडच्या कृषि अधिकारी गुणनियंत्रण मानसी पवार सहभागी होते.







