मुंबई :
मुंबई महापालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या घोषणेमुळे राजकीय वातावरण तापू लागले असून, पहिल्याच यादीत भाजप आणि उद्धव ठाकरे गटाकडून व्होटबँक पॉलिटिक्स स्पष्टपणे समोर आली आहे. अनेक दिवसांपासून प्राण कंठाशी आणून उमेदवारीची वाट पाहणाऱ्या इच्छुकांच्या हाती अखेर उमेदवारी अर्ज पडू लागले असून, राजकीय पक्षांच्या याद्या म्हणजे मतपेढ्या मजबूत करण्याची कसरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने ७५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे, तर भाजपनेही ६६ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. मुंबईचा महापौर मराठीच असणार, असा ठाम दावा ठाकरे गट आणि महायुतीकडून केला जात असून, त्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणांगणात रंग भरू लागला आहे.
पहिल्या यादीकडे पाहता मराठी महापौर घडवण्यासाठी राजकीय पक्षांनी व्होटबँकेवर विशेष भर दिल्याचे दिसून येते. कारण व्होटबँक टिकवली तरच विजयाचा मार्ग सुकर होणार, हे दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारी यादीतून अधोरेखित होत आहे.
भाजपने जाहीर केलेल्या ६६ उमेदवारांच्या यादीत अमराठी उमेदवारांचा प्रभाव लक्षणीय आहे. अमराठी मतदारांची व्होटबँक जपण्यासाठी भाजपने मोठ्या प्रमाणात अमराठी उमेदवारांना संधी दिल्याचे दिसते. भाजपने ६६ पैकी तब्बल २० अमराठी उमेदवार मैदानात उतरवले असून, त्यामध्ये जितेंद्र पटेल, राणी त्रिवेदी, जिग्ना शाह, शिवकुमार झा, स्वाती जैस्वाल, सिद्धार्थ शर्मा, विनोद मिश्रा, तेजिंदर सिंह तिवाना, संदीप पटेल, सुधा सिंह, ममता यादव, हेतल गाला, नील सोमय्या, चंदन शर्मा, साक्षी कनोजिया, रवी राजा आणि आकाश पुरोहित यांचा समावेश आहे. मात्र, भाजप मराठीचा सन्मान राखत सामाजिक समतोल साधत असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दुसरीकडे, ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवारी यादीची वैशिष्ट्ये वेगळी आहेत. ‘फोर एम’ अर्थात मुंबई, मराठी, महिला आणि मुस्लीम या चार घटकांवर उद्धव ठाकरे यांनी भर दिल्याचे दिसते. ठाकरे गटाने ४० महिलांना उमेदवारी दिली असून, मुंबईच्या रणांगणात ६ मुस्लीम उमेदवार उतरवले आहेत. त्यापैकी ४ महिला उमेदवार आहेत. उमेदवारी यादीतील ठळक मराठी छाप आणि महिलांचे मोठे प्रतिनिधित्व यशस्वी ठरेल, असा विश्वास ठाकरे गटाला आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप आणि ठाकरे गट दोघेही आपापली व्होटबँक जपण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होते. अमराठी मतदार भाजपची कितपत साथ देतात, तसेच मराठी व मुस्लीम मतदार ठाकरे गटाच्या शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांना किती संख्येने निवडून देतात, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालांकडे पाहिल्यास मुस्लीम मतदारांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या बाजूने कौल दिल्याचे चित्र होते. त्यामुळे त्याच अनुभवाच्या आधारे उद्धव ठाकरे यांनी ही रणनीती अवलंबली का, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.






