मालवण नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग येत असताना प्रभाग सात ‘अ’ मधून भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी आपल्या सामाजिक कार्याचा आणि प्रभागातील विकासाच्या दृष्टीकोनाचा वेध घेत मतदारांशी संवाद साधला. गेली दहा वर्षे मालवणच्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना सांस्कृतिक, क्रीडा आणि आरोग्यविषयक अनेक उपक्रम राबविल्याची आठवण करून देत पक्षाने आपल्या कार्याचा योग्य सन्मान करत प्रभाग सातमध्ये उमेदवारी दिल्याचे ते म्हणाले.
“प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि पर्यटनदृष्ट्या मालवण शहर अधिक सुंदर, सुबक आणि सुविधायुक्त करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे,” असे ताम्हणकर यांनी स्पष्ट केले.
भाजप उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रभाग सात ‘अ’ मधून सौरभ ताम्हणकर, तर सात ‘ब’ मधून सौ. दिपाली दिलीप वांगणकर हे कमळ निशाणीवर निवडणूक लढवीत असून गेल्या चार दिवसांत त्यांच्या डोअर-टू-डोअर प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा खोत याही प्रचारयंत्रणेत सक्रिय असून तिन्ही उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला.
यावेळी मतदारांसमोर मांडताना श्री ताम्हणकर म्हणाले की,
“प्रभागातील विकासाचे प्रश्न असोत किंवा संपूर्ण मालवण शहराच्या प्रगतीचा आराखडा— आम्ही मतदारांच्या सूचनांवर आधारित सकारात्मक बदल घडविण्यास कटिबद्ध आहोत.”
“पक्ष आदेश महत्त्वाचा, म्हणून प्रभाग सातमध्ये मैदानात”
पूर्वी प्रभाग आठमध्ये इच्छुक असलेले ताम्हणकर पुढे सांगतात—
“पक्षाने आदेश दिल्यामुळे प्रभाग सातमध्ये मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. माझ्यासाठी पक्ष निर्णय सर्वांत महत्त्वाचा आहे. समाजकार्याचा दांडगा अनुभव आणि प्रभाग आठमधील सेवेचा वारसा घेऊन आता प्रभाग सातच्या विकासासाठी पूर्णवेळ कार्यरत राहणार आहे.”
प्रभागातील भाजप समर्थकांचा मोठा वर्ग लक्षात घेता त्यांना व्यापक पाठींबा मिळत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
“आमचे घरच या मतदारसंघात असल्याने येथील समस्या आम्हाला चांगल्या ठाऊक आहेत. यापूर्वी या प्रभागातून भाजपच्या नगरसेविका निवडून आल्या आहेत. त्यामुळे मतदारांचा ठाम पाठिंबा आम्हाला मिळेल,” असे त्यांनी नमूद केले.
प्रभागाच्या विकासासाठी ठोस आराखडा
ताम्हणकर यांनी प्रभागाच्या भावी विकासाची रूपरेषाही स्पष्ट केली.
त्यांच्या म्हणण्यानुसार—
- प्रभागाचा नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करणार
- शासकीय जमिनींचा जनहितार्थ उपयोग करून
- बालोद्यान,
- नाना-नानी पार्क,
- युवकांसाठी व्यायामशाळा यांसारख्या सुविधा उभारण्याचा मानस
- नागरिकांच्या घरी जाऊन समस्या ऐकून त्यांचे त्वरित निराकरण करण्यावर भर
“सर्वांना सोबत घेऊन प्रभागाचा परिपूर्ण, सुबक आणि सर्वसमावेशक विकास साधणे हा आमचा प्रयत्न राहील,” असे ताम्हणकर यांनी सांगितले.
मालवण नगरपालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे भाजप उमेदवारांचा प्रचार वेगाने वाढत असून प्रभाग सातमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली आहे.







