सावंतवाडी | प्रतिनिधी
सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या प्रचारसभेत मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शहरातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. गांधी चौकात झालेल्या मेळाव्यात राणे यांनी “ही अंदर की बात आहे… दीपकभाई आमच्यासोबत आहेत… श्रद्धाताईंना मत म्हणजे दीपकभाईंनाच मत” असा दावा करत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोसले यांना दीपक केसरकर यांचा अंतर्गत पाठिंबा असल्याचे सूचित केले.
राणे यांची ही भूमिका, चौफेर फटकेबाजी आणि विरोधकांवरील टीकास्त्रामुळे राजकीय चर्चांना अधिक चढ मिळाला. त्यांनी राजघराण्याच्या आशीर्वादाने दीपक केसरकर यांनी राजकारणाची सुरुवात केली होती, हेही स्मरण करून देत “अपेक्षा होती की श्रद्धाताईंना त्यांनी खुलेपणाने साथ द्यावी” असे वक्तव्य केले.
याचबरोबर “राजघराण्याच्या विरोधात बोलणाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सावंतवाडीकरांनी आता उत्तर द्यायलाच पाहिजे” असेही राणे म्हणाले.
मात्र, या सर्व दाव्यांचे शिवसेना (शिंदे गट) नेते दीपक केसरकर यांनी तात्काळ खंडन करत कठोर व स्पष्ट प्रत्युत्तर दिले.
दीपक केसरकर यांचे ठाम प्रत्युत्तर — “भावनिक मुद्दे नकोत, विकासाची भाषा बोला”
भाजपच्या सभेनंतर माध्यमांशी संवाद साधताना केसरकर म्हणाले—
- “राजघराण्याबाबत माझा आदर पूर्वीही होता आणि आजही आहे. सावंतवाडीच्या विकासात राजघराण्याचे योगदान मोठे आहे. याबाबत दुमत नाही.”
- “मात्र, माझ्या आजारपणाचा राजकीय गैरफायदा घेऊ नये. मी आजारी आहे, आरामासाठी घरी आहे.”
- “मला कोणताही पाठिंबा भाजपला दिलेला नाही. शिवसेनेचे (शिंदे गट) पॅनेल उभे केले आहे. शिवसेनेच्या पॅनेलला मत म्हणजे मलाच मत.”
- “नितेश राणेंनी भावनिक वातावरण निर्माण न करता विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी. गैरसमज पसरवू नयेत.”
- “राणेंचे वक्तव्य नीतिमत्तेला धरून नाही. सावंतवाडीकरांनी अफवांना बळी पडू नये.”
केसरकरांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे राणे यांच्या दाव्यांभोवती निर्माण झालेली चर्चा एका वेगळ्याच दिशेने वळली आहे.
राजघराण्याच्या आदराच्या मुद्द्यावर दोन्ही बाजू ठाम
सावंतवाडीकरांच्या मनात राजघराण्याबद्दल असलेला खोल आदर या निवडणुकीत देखील संवेदनशील मुद्दा ठरला आहे.
भाजपकडून राजघराण्याच्या ‘विकसित सावंतवाडी’ या स्वप्नाचा उल्लेख करण्यात आला, तर शिवसेना (शिंदे गट) कडून राजघराण्याबद्दलचा सन्मान कायम असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.
राजकीय वादातून निवडणूक आणखी रंगली
नितेश राणे यांची “अंदर की बात”
VS
दीपक केसरकर यांचे “खोटे दावे, गैरसमज पसरवू नका”
या संघर्षामुळे सावंतवाडीची निवडणूक अधिकच चुरशीची झाली असून पुढील घडामोडींवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष केंद्रीत होणार आहे.







