MLA Nilesh Rane claims 352 notices were issued to fishermen during Vaibhav Naik’s 10-year tenure, countering Naik’s statement on CRZ-related notices in Malvan.
मालवण (प्रतिनिधी):
किनारपट्टीवरील बांधकामे हटविण्याबाबत मालवणमधील मच्छिमारांना आपल्या कार्यकाळात नोटीसा आल्या नाहीत, असा दावा करणारे माजी आमदार वैभव नाईक यांचा अभ्यास कमी असल्याची टीका आमदार निलेश राणे यांनी केली आहे. वैभव नाईक यांच्या आमदारकीच्या दहा वर्षांच्या काळात मच्छिमारांना एकूण ३५२ नोटीसा बजावण्यात आल्याचे सांगत त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा राणे यांनी केला.
मालवण किनारपट्टीवर सीआरझेड उल्लंघनाच्या प्रकरणी प्रशासनाने मच्छिमारांना नोटीसा बजावल्यानंतर आम. निलेश राणे यांनी कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयात मच्छिमारांची बैठक घेतली होती. या पार्श्वभूमीवर वैभव नाईक यांनी राणे यांच्यावर टीका केली होती. त्यास प्रत्युत्तर देताना राणे म्हणाले की, “माझ्या आमदारकीला अवघे एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र नाईक दहा वर्षे आमदार असताना ३५२ नोटीसा मच्छिमारांना आल्या. तरीही आपल्या कार्यकाळात एकही नोटीस आली नाही, असे सांगणे चुकीचे आहे.”
मच्छिमारांना मिळालेल्या नोटीसांबाबत नाईक यांनी कधीही विधानसभेत प्रश्न उपस्थित केला नाही, असा आरोपही राणे यांनी केला. “मच्छिमार अडचणीत असताना त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न नाईक करतात. त्यामुळे मच्छिमारांनाही सत्य परिस्थिती समजली आहे,” असे ते म्हणाले.
मालवणमध्ये एका व्यक्तीकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या तक्रारींमुळेच अधिक प्रमाणात नोटीसा बजावल्या जात असल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले. तसेच वेंगुर्ला व देवगड येथील मच्छिमारांनाही विविध कारणांवरून नोटीसा देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
मच्छिमारांच्या बांधकाम विषयक प्रश्नावर आपण स्वतः आणि पालकमंत्री नितेश राणे लक्ष देत असून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आम. निलेश राणे यांनी सांगितले. “गेल्या दहा वर्षांत न सुटलेला प्रश्न आम्ही रेंगाळत ठेवणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.







