- सिंधुदुर्गात भाजप–शिवसेना महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला जाहीर
- कणकवलीत खासदार नारायण राणेंकडून अधिकृत घोषणा
- भारतीय जनता पार्टी ३१ जिल्हा परिषद जागा लढवणार
- शिवसेना जिल्हा परिषद १९ जिल्हा परिषद जागा लढवणार
- राष्ट्रवादी काँग्रेसचाही विचार होणार
- विरोधकांकडे जिकंण्यासारखा एकही मतदारसंघ नाही- खा.नारायण राणे
- जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजप तीन वर्ष तर शिवसेना दोन वर्षाच्या फॉर्म्युल्यावरही शिक्कामोर्तब
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप–शिवसेना महायुतीमधील जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला आहे. कणकवली येथे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत हा फॉर्म्युला अधिकृतपणे जाहीर केला. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना यामुळे पूर्णविराम मिळाला असून, जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
घोषणेनुसार, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप ३१ जागांवर तर शिवसेना १९ जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर पंचायत समितीसाठी भाजप ६५ आणि शिवसेना ३७ जागांवर उमेदवार देणार आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार भविष्यात नक्कीच राहील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
ही महत्त्वपूर्ण घोषणा कणकवली येथील ओमगणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. या परिषदेला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्यासह महायुतीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठीही भाजप–शिवसेना महायुतीत एकमत झाले आहे. ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार पाच वर्षांच्या कार्यकाळात भाजपकडे तीन वर्षे तर शिवसेनेकडे दोन वर्षे अध्यक्षपद राहणार असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या निर्णयामुळे महायुतीतील नेतृत्व आणि सत्तावाटपाबाबतची संभ्रमावस्था संपली असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुती अधिक आक्रमक रणनीतीने मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महायुतीच्या जागावाटपाचा विधानसभानिहाय फॉर्म्युला
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात जि.प. भाजप ११, सेना १७, प.स. भाजप ६, सेना १७
कुडाळ विधानसभा मतदारसंघात जि.प.भाजप ४, सेना १५, प.स. भाजप ११ सेना १५
कणकवली विधानसभा मतदारसंघात जि.प.भाजप १६, सेना २, प.स. भाजप ३१, सेना ५
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी महायुतीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, नेतृत्व कोणाकडे राहणार, याबाबत जिल्ह्यात मोठी उत्सुकता होती. अखेर या जागावाटपाच्या घोषणेमुळे महायुतीची रणनीती स्पष्ट झाली असून, एकत्रित शक्तिप्रदर्शनातून निवडणूक लढवण्याचा निर्धार यावेळी नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला.
महायुतीच्या या ठोस निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना राजकीय रंग चढला असून, विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.








