पेण | आगामी पेण नगरपरिषद निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे नंदाताई म्हात्रे यांनी थेट नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करून निवडणूक रणांगणात अधिकृत प्रवेश केला आहे. २०१९ च्या पेण विधानसभा निवडणुकीतून राजकीय प्रवासाला सुरुवात केलेल्या नंदाताई यांनी यानंतर संघटनात्मक जबाबदाऱ्या, कौटुंबिक अडचणी आणि सामाजिक काम यांचा समतोल साधत सातत्याने सक्रिय भूमिका निभावली आहे.
पेण विधानसभा क्षेत्र व्यापक असल्यामुळे पुरेसा वेळ देता न आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र, गेली चार वर्षे पेण नगरपरिषदेत प्रशासक म्हणून काम करताना शहरातील वंचित आणि शोषितांचे प्रश्न हाताळताना त्यांनी पेण शहरात प्रत्यक्ष काम करण्याची गरज जाणवली. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ‘सर्वसाधारण महिला’ असल्याने अनेकांनी “ताई, तुम्ही ही जबाबदारी घ्या”, अशी अपेक्षा व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.
“किमान १० टक्के लोकांना जर माझी उमेदवारी योग्य वाटत असेल तरच मी विचार करीन,” असे त्यांनी सुरुवातीला म्हटले होते. परंतु महाविकास आघाडीत निर्णय प्रक्रियेत अनिश्चितता असताना १२ नोव्हेंबर रोजी प्रदेश पार्लमेंटरी बोर्डच्या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्टपणे, “परिणामांचा विचार करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे,” अशी ग्वाही दिली. त्यानंतर थेट AB फॉर्म मिळताच नंदाताईंनी उमेदवारी निश्चित केली.
नगराध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडण्यास आपण इच्छुक असल्याचा निर्धार व्यक्त करत नंदाताईंनी आज औपचारिकपणे उमेदवारी अर्ज दाखल केला. पेणकरांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि पाठिंब्याची अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. “ही लढाई जनतेच्या विश्वासाची आहे,” असे त्यांनी उल्लेख केले.






