मालवण | भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांच्या घरावर आमदार निलेश राणे यांनी घातलेल्या धाडीच्या प्रकरणाने जिल्ह्यात मोठे राजकीय वादळ उठले आहे. या धाडीत तब्बल २० लाख रुपयांची रोकड सापडल्याचा दावा राणेंनी केला होता. “ही रक्कम मालवण निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी आणली होती,” असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. मात्र, आज संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विजय केनवडेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आणि आमदार राणेंवर थेट घाणेरडे राजकारण केल्याचा आरोप करत कायदेशीर लढाईची घोषणा केली.
“माझ्या घरात अनधिकृत प्रवेश; कॅमेरे व कार्यकर्ते घेऊन बेडरूमपर्यंत घुसखोरी”
पत्रकार परिषदेत केनवडेकर म्हणाले,
“आमदार निलेश राणे यांनी माझ्या परिसरात, घरात आणि अगदी बेडरूममध्येही कॅमेरे व कार्यकर्ते घेऊन अनधिकृतपणे प्रवेश केला. हे अत्यंत निंदनीय आहे. माझ्या घरात सापडलेले २० लाख रुपये हे माझ्या ‘केके कन्स्ट्रक्शन’ कंपनीचे असून शहरातील सुरू असलेल्या बांधकामाच्या खर्चासाठी ठेवले होते.”
विजय केनवडेकर पुढे म्हणाले,
“मी निवडणूक लढवत नाही, माझ्याकडे प्रचाराचे पद नाही. फक्त रवींद्र चव्हाण यांचा कार्यकर्ता असल्यामुळे माझ्यावर कारवाई करण्यात आली. सापडलेली रक्कम माझ्या कंपनीची आहे हे मी पुराव्यांसह सिद्ध करणार आहे.”
“माझे कुटुंब दहशतीत; आमच्यावर अजूनही लक्ष ठेवले जाते”
गंभीर भावनेने केनवडेकर म्हणाले,
“या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात माझ्याबद्दल चुकीचे वातावरण निर्माण करण्यात आले. माझे कुटुंब आज दहशतीखाली आहे. आजही आमच्या घरावर लक्ष ठेवले जात आहे. गेली ८० वर्षे माझे कुटुंब मालवणात व्यवसाय, उद्योग आणि समाजकार्यात आहे. आमदार राणेंनी आमच्या ७५ वर्षांच्या तपश्चर्येला तडा दिला आहे.”
भाजपशी न जोडू नका – ‘ही केनवडेकर परिवाराची प्रेस कॉन्फरन्स’
या पत्रकार परिषदेला त्यांच्या कुटुंबीयांचीही उपस्थिती होती.
केनवडेकर म्हणाले,
“ही पत्रकार परिषद आम्ही केनवडेकर कुटुंब म्हणून घेत आहे. याचा भाजपशी संबंध जोडू नये. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. पण पक्षातील कोणावरही माझा राग नाही; माझा राग आहे तो निलेश राणे यांच्या कृतीवर.”
“माझ्यावर दबाव आणला तरी मी माघार घेणार नाही; इतरांच्याही कुंडल्या माझ्याकडे आहेत”
आपला आवाज कडकावत त्यांनी स्पष्ट इशारा दिला—
“माझ्यावर कितीही दबाव आणा, मी कोणाच्याही धमक्यांना भीक घालत नाही. माझा व्यवसाय कोणी थांबवू पाहत असेल तर माझ्याकडेही सर्वांच्या कुंडल्या आहेत. मी कोणाला सोडणार नाही. घाणेरड्या राजकारणाला उत्तर कायदेशीर मार्गाने देईन. यात माझे बलिदान गेले तरी चालेल.”
दीर्घ राजकीय व सामाजिक योगदानाची आठवण
केनवडेकर यांनी आपला भूतकाळ मांडताना सांगितले—
“मी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंसोबत अनेक वर्षे काम केले. रवींद्र चव्हाण माझ्यासाठी वडिलांसारखे आहेत. नारायण राणेंच्या MSME खात्यांतून जिल्ह्यात राबविलेल्या अनेक उपक्रमांत माझा सहभाग आहे. त्यांच्या पहिल्या भाजप निवडणुकीत मी प्रचार प्रमुख होतो.”
आमदार निलेश राणे यांच्याशी झालेल्या या संघर्षाने मालवणच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. केनवडेकर यांनी दाखविलेला कठोर तेवर आणि पुढील कायदेशीर लढाईची घोषणा यामुळे या प्रकरणाचे पुढील पडसाद अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.







