मालवण | “भारताचे नागरिक म्हणून आपले अस्तित्व हे भारतीय संविधानामुळे आहे. त्यामुळे संविधानातील मूलभूत हक्क आणि कर्तव्य प्रत्येकाने जाणून घेणे अत्यावश्यक आहे,” असे मत ऍड. संग्राम कासले यांनी व्यक्त केले. भंडारी ए. सो. हायस्कूल येथे संविधान दिनानिमित्त आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात ते बोलत होते.
भंडारी ए. सो. हायस्कूल, समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग आणि बार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला मुख्याध्यापक हनुमंत तिवले, आर. डी. बनसोडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या सहभागातून संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करून झाली. प्रास्ताविकात आर. डी. बनसोडे यांनी भारतीय संविधानाच्या निर्मिती प्रक्रिया आणि त्याचा इतिहास विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.
यावेळी मार्गदर्शन करताना ऍड. संग्राम कासले म्हणाले, “भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समता, स्वातंत्र्य, शोषणाविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्य तसेच सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार असे अनेक मूलभूत हक्क दिले आहेत. याच अधिकारांमुळे नागरिकांचे जीवन अधिक सुसह्य आणि सुरक्षित झाले आहे.”
ते पुढे म्हणाले, “हक्कांसोबतच संविधानाने मूलभूत कर्तव्येही दिली आहेत. या कर्तव्यांचे पालन करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. शिक्षक व पालकांनी लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख करून देणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यांच्या मनात संविधानाबद्दल आदर व सन्मानाची भावना दृढ होईल.”
कार्यक्रमात भंडारी हायस्कूलच्या वतीने ऍड. संग्राम कासले यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार आर. डी. बनसोडे यांनी मानले.







