प्रश्न 1 : प्रभाग ७ मधील निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय कसा आणि का घेतला?
तेजस नेवगी: प्रभाग क्रमांक ७ हा मालवण शहराच्या मध्यवर्ती भागात असून गेल्या कित्येक वर्षांपासून सांडपाणी, कचरा व्यवस्थापन, खंडित वीजपुरवठा, कमी दाबाचा वीज प्रवाह, अरुंद रस्ते अशा मूलभूत समस्या प्रलंबित आहेत. या तातडीच्या प्रश्नांकडे नीट लक्ष न दिल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. हे सगळं प्रत्यक्ष पाहिल्यावर “बदलाची वेळ आली” असं मनापासून वाटलं आणि म्हणूनच निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.
प्रश्न 2 : आपल्या प्रभागासाठी आपण कोणते प्रमुख बदल करू इच्छिता?
नेवगी: सर्वप्रथम सांडपाणी प्रकल्पाचा दर्जा सुधारून, सांडपाणी निचरा करण्यासाठी आधुनिक आणि टिकाऊ यंत्रणा उभी करणार आहे. कचरा संकलनासाठी विभागनिहाय वेळापत्रक, तंत्रज्ञानावर आधारित मॉनिटरिंग आणि योग्य निवासीत सुविधा उपलब्ध करून देणार.
वीजपुरवठा हा सतत खंडित होतो—यावर खास लक्ष देऊन कमी दाबाच्या तक्रारी मिटविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून दीर्घकालीन उपाय राबविणार.
त्याचबरोबर अरुंद रस्ते रुंदीकरण, पायी चालणाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग यावरही माझा भर असेल.
प्रश्न 3 : ‘नवीन व्हिजन’ बद्दल आपण बोलता—ते नेमकं काय?
नेवगी: विकास म्हणजे फक्त रस्ते-डांबरीकरण नव्हे. प्रभागाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन स्मार्ट पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक आहे.
• पर्यटनाच्या दृष्टीने बंदर-जेटी सुशोभीकरण
• आधुनिक सेल्फी पॉइंट
• स्वच्छ, कलात्मक सार्वजनिक जागा
• महिला व वयोवृद्धांसाठी विशेष सुविधा
• तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा वितरण
हे सर्व माझ्या ‘नवीन व्हिजन’चा भाग आहे.
प्रश्न 4 : प्रचारात मिळणारा जनतेचा प्रतिसाद कसा आहे?
नेवगी: अतिशय उत्साहवर्धक. माजी आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, सर्व पदाधिकारी आमच्यासोबत घरोघर भेट देऊन प्रचार करत आहेत. लोकांची प्रतिक्रिया पाहून स्पष्ट जाणवतं—या वेळी मतदार बदल घडवण्याच्या मनःस्थितीत आहेत. नवीन चेहरा, नवीन विचार आणि काम करण्याची उर्मी या तिन्ही गोष्टींमुळे नागरिक आमचे स्पष्टपणे समर्थन करत आहेत.
प्रश्न 5 : विरोधकांकडून विकासाबद्दल नेहमी दावे केले जातात; आपण त्याकडे कसे पाहता?
नेवगी: गेल्या अनेक वर्षांत प्रभागात काय झालं आणि काय नाही हे नागरिकांच्या डोळ्यासमोर स्पष्ट आहे. आम्ही खोटे दावे करत नाही; आम्ही प्रत्यक्ष कृतीची हमी देतो. आमचा प्रचार अपप्रचारावर आधारित नाही—तो समस्यांवर आणि उपायांवर आधारित आहे. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना जनता गांभीर्याने घेणार नाही, हा मला विश्वास आहे.
प्रश्न 6 : तरुणांना आणि भविष्यातील पिढीला आपण काय संदेश द्याल?
नेवगी: शहर विकासात तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. प्रभागातील तरुणांना रोजगार, कौशल्यविकास, पर्यटन क्षेत्रातील संधी उपलब्ध करून देणे प्राधान्य असेल. आम्ही तरुणाईच्या ऊर्जा आणि कल्पकतेला व्यासपीठ देऊ—हे माझं वचन.
प्रश्न 7 : निवडून आल्यानंतर पहिली कोणती गोष्ट केल्या जाईल?
नेवगी: सर्वप्रथम प्रभागातील सांडपाणी आणि वीजपुरवठा समस्यांवर तातडीने कृती. या दोन मुद्द्यांना सर्वाधिक तक्रारी मिळतात आणि दैनंदिन जीवन थेट विस्कळीत होते. यानंतर पर्यटन-विकास आणि रस्ताविकास या मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणावर काम सुरू करणार.
शेवटी मतदारांसाठी आपला संदेश?
नेवगी: “गेल्या वर्षांच्या समस्यांचे ओझे दूर करून, आधुनिक प्रभाग निर्माण करण्याची जबाबदारी मला द्यावी.”
विकास, पारदर्शकता आणि तातडीची कामे—यासाठीच आपण मतदान करा. ठाकरे शिवसेनेचे मशाल चिन्ह दाबून मला आणि गौरी मयेकर यांना त्यासोबत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पुजा करलकर यांना विजयी करा, अशी नम्र विनंती.







