२ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या मालवण नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी टाकलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मुळे कोकणातील राजकीय वातावरण अक्षरशः स्फोटक बनले आहे. भाजप पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरात थेट धाड टाकून बेडरूममध्ये पैशांनी भरलेल्या बॅगा सापडल्या असल्याचा दावा राणे यांनी केला. या संपूर्ण कारवाईचे त्यांनी मोबाईलवर थेट व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आहे.
राणे यांनी २० ते २५ लाख रुपयांची रोखरक्कम असल्याचे सांगितले, तर ३–४ बॅग असल्याची माहितीही दिली. एवढेच नव्हे, तर अशाच प्रकारे ८ ते १० घरांमध्ये निवडणुकीसाठी पैसे वाटपाची तयारी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. या सर्व घडामोडींनंतर मालवणचे वातावरण क्षणात तापले. आणि आता हे प्रकरण मालवणपुरते मर्यादित न राहाता राज्याच्या राजकारणानेच या सगळ्या प्रकरणाने पेट घेतलाय. शिवसेना आमदार निलेश राणे यांची भ्रष्टाचारमुक्त निवडणूक मोहीम राज्याच्या राजकारणात शुद्धीकरणाचा नवा प्रयोग मानला जात आहे.
🔹 राणेंची गंभीर आरोपांची मालिका
राणे म्हणाले—
“मालवणमधील ५ ते ७ ठिकाणी पैशांच्या बॅगा आणल्या जात आहेत. इथून भाजप कार्यकर्ते पैसे घेऊन जातात आणि मतदारांपर्यंत पोहोचवतात. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मालवण दौर्यानंतरच ही रक्कम आली आहे. हे सिंधुदुर्गच्या संस्कृतीला शोभणारे नाही.”
तसेच, “काही बाहेरून आलेले लोक चुकीचे कल्चर आणतात; हे थांबले पाहिजे,” अशी मागणीही त्यांनी केली.
🔹 केनवडेकरांचा तीव्र विरोध
दरम्यान या प्रकरणी ज्या भाजप पदाधिकार विजय केनवडेकर यांच्यावर आरोप ठेवण्यात आले ते व्यावसायिक असल्याने त्याने हे सर्व आरोप फेटाळून लावत पैसे हे निवडणुकीसंदर्भात नसल्याचे विधान केले आहे
“ही रक्कम पूर्णपणे वैध असून माझ्या बांधकाम व्यवसायाशी संबंधित आहे. घरात कोणतीही अनधिकृत रक्कम नाही. विरोधकांकडून केलेले सर्व आरोप खोटे व दिशाभूल करणारे आहेत.”
🔹 चव्हाणांचा राणेंवर थेट पलटवार
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राणेंवर पलटवार केला. ते म्हणाले—
“ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला निवडून आणलं, त्यांच्या घरी जाऊन अशी कृती करणे चुकीचे आहे. त्यांच्या व्यावसायिक कामात हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणाला नाही. राणेंच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे, त्यामुळेच अशा कारवाया आणि आरोप सुरू झाले आहेत. पोलिस व निवडणूक आयोग तपास करतील; खरे-खोटे तेच निश्चित करतील.”
🔹 शिवसेना–भाजप संघर्ष शिगेला
स्थानिक राजकारणात दोन्ही पक्षांतील तणाव आता उघडपणे समोर आला आहे. युती न होण्याचे मूळ कारण चव्हाण असल्याचा आरोप राणेंनी पुन्हा एकदा केला आहे.
“भाजपकडे विकासाचा अजेंडा नाही; ते केवळ पैशांच्या बळावर निवडणुका लढवतात,” असा आरोपही त्यांनी केला.
🔹 चंद्रशेखर बावनकुळे यांची निलेश राणे यांच्या कृतीवरच टीका
त्यांच्या घरात पैसे का होते, कुठून आणले, कोणत्या व्यवहारातून आणले. हे सर्व तपासणे आवश्यक आहे. मात्र आज असं म्हणणं की भाजप कार्यकर्त्याच्या घरात पैसे सापडले आणि एखाद्याच्या घरात थेट जाऊन बेडरूमपर्यंत स्टिंग ऑपरेशन करणे, हे योग्य नसल्याचीही प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय. निलेश राणे यांनी हे असं का केलं, हे मला समजत नाही. पण बेडरूमपर्यंत जाऊन अशा पद्धतीने व्हिडिओ शूट करणे हे निश्चितच नियमबाह्य वाटतं. त्याऐवजी त्यांनी हे प्रकरण पोलीस किंवा निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिलं असतं, तर अधिक योग्य ठरलं असतं. या प्रकरणात निवडणूक आयोग आणि पोलीस योग्य ती कारवाई करतील. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
🔹 महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली चिंता
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुरू असलेल्या पैशांच्या राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पैसे किती द्यायचे? यावर मतांची चढाओढ सुरू असून, कामावर नव्हे, तर पैशांवर मते मागितली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
🔹 रोहित पवार म्हणतात..
निवडणुका जिंकण्यासाठी वारेमाप पैशाचा वापर करणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा पुराव्यासह उघड केल्याबद्दल शिवसेना नेते आ. निलेश जी राणे यांचे मनापासून आभार! सत्तेत असताना मलिदा खायचा आणि नंतर त्याचाच वापर करुन निवडणुका जिंकायच्या हाच भाजपच्या विजयाचा ‘फॉर्म्युला’ आहे.. यात कोणतीही चाणक्य नीती नाही. आता मित्रपक्षाच्याच आमदाराने टराटरा कपडे फाडल्याने ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे नाकाने कांदे सोलण्याचे धंदे भाजपाने बंद करावेत आणि आपले पाय मातीतच नाही तर चिखलात पूर्ण माखलेले आहेत, हे मान्य करावं. या शब्दात रोहित पवारांनी टिका केली आहे.
🔹आशिष शेलार यांची तीव्र प्रतिक्रिया
आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया देताना निलेश राणे यांचे आरोप तद्दन खोटं आणि असत्य असल्याचे म्हणत “आरोप हवेतील आहेत. पैसे व्यवसायाचे असून निवडणुकीशी संबंध नाही.” अशी प्रतिक्रिया दिली आहे
🔹शिवसेना उबाठा गटाचे वैभव नाईक म्हणतात –
मालवणात धाड पडलेल्या भाजपच्या विजय केनवडेकर यांनीच नारायण राणे आणि निलेश राणेंच्या निवडणुकीतही पैसे वाटले होते. त्यामुळेच नगरपरिषद निवडणुकीत केनवडेकर यांच्याकडे भाजपचे पैसे येणार हे निलेश राणेंना माहीत होतं.







