गवंडीवाडा–बाजारपेठ प्रभागात मंदार ओरसकर यांचा निर्धाराचा संदेश; मतदारांमध्ये उत्सुकता
मालवण | प्रतिनिधी
मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला वेग येत असताना प्रभाग क्र. ०८अ गवंडीवाडा–बाजारपेठ येथे उमेदवारी जाहीर केल्यानंतर श्री. मंदार सुहास ओरसकर यांच्या प्रचाराने चांगलाच जोर पकडला आहे. जनसंपर्क उपक्रम आणि लहानमोठ्या बैठकीत मतदारांशी संवाद साधताना ओरसकर यांनी आपला भूमिकापत्र—निर्धार आणि सेवाभावाचा संदेश—स्पष्ट मांडला आहे.
“सुखवस्तू कुटुंबातील असूनही मला कौटुंबिक पार्श्वभूमी ही जनसामान्यांशी थेट जोडली जाणारी आहे. हे शहर माझे आहे, इथे मी लहानाचा मोठा झालोय. मला माझा प्रभाग आणि माझे शहर मोठे करायचे आहे. जनतेसाठी संघर्ष करण्याची ताकद घेऊन पुढे चाललो आहे. तुमच्या सेवेसाठी, तुमच्या कल्याणासाठी माझं प्रत्येक पाऊल पुढे टाकीन आणि हा शब्द कधीच कमी पडू देणार नाही,” असे भावनिक आवाहन मंदार ओरसकर यांनी मतदारांना केले.
प्रभागातील समस्या, स्थानिक पायाभूत सुविधा, व्यापारी वर्गाच्या गरजा आणि परिसरातील मूलभूत सेवांच्या उन्नतीसाठी ते कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तरुण नेतृत्व, उपलब्धता आणि लोकांशी नाळ जुळणारा संवाद — या गुणांमुळे त्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले.
“साथ द्या, विचार एक करा आणि विजयी करा,” अशी विनंती करत त्यांनी मतदारांना मशाल चिन्हासाठी प्रचंड बहुमताने मतदान करण्याचे आवाहन केले.
प्रचाराचा जोर, उमेदवाराचा आत्मविश्वास आणि मतदारांमधील सकारात्मक चर्चा पाहता प्रभाग ०८अची निवडणूक यंदा रंगतदार होणार हे निश्चित दिसत आहे.







