सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना प्रभाग ७ मधील शिवसेनेच्या सभेत आमदार निलेश राणेंची तोफ दणक्यात धडाडली. “ही लढत प्रजा विरुद्ध राजा अशी आहे; आणि जिंकणार मात्र प्रजाच!” अशा शब्दांत त्यांनी आगामी निकालाचा धडाकेबाज दावा केला. शहरातील वातावरण तापवणाऱ्या या सभेत राणेंनी २१-० असा शत-टक्के विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला.
सभेमध्ये उमटलेल्या गर्दीने उमेदवार संजू परब यांच्या वाढत्या प्रभावाची स्पष्ट जाणीव होत असल्याचे राणेंनी सांगितले. “पडत्या काळात संजू माझ्या सोबत उभा होता, त्याची नियत खरी आहे. विपरीत परिस्थितीतही तो खंबीर राहिला. म्हणूनच मी आज संजूसोबत आहे,” असे ते म्हणाले.
त्यांनी विशाल परब यांच्यावरही टीका करत “विशाल परबची नियत होती खोटी, म्हणूनच लोक त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत,” असा घणाघात केला. संजू परब यांच्या सडेतोड बोलण्यामुळे अनेकजण ‘घायाळ’ झाले असल्याचे सांगत, त्याच्या आक्रमक भूमिकेमुळेच निवडणुकीचा ‘रेट’ प्रचंड वाढल्याचे त्यांनी नमूद केले.
“संजू खोटं सहन करू शकत नाही म्हणूनच अनेकांना तो अंगावर घेतो. संजूने जे विषय समोर आणले, ते खरे आहेत. त्याच्या विरोधात डाव रचला जात असला तरी मी त्याच्या सोबत भक्कम उभा आहे,” असे राणेंनी ठामपणे सांगितले.
दीपक केसरकर यांच्या सभेत उपस्थितीचा उल्लेख करत त्यांनी म्हटले, “दीपक केसरकर मैदानात उतरले म्हणजे संजूसह सर्वांचा शंभर टक्के विजय ठरलेलाच!”
प्रभाग ७ मधील या सभेला शिवसेनेचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, पक्ष निरीक्षक राजेश मोरे, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अॅड. नीता सावंत कविटकर तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते. वातावरणात उसळलेल्या उत्साहाने सावंतवाडीतील निवडणूक आता अधिक रंगतदार होणार असल्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.







