“लोकसेवेसाठी आम्ही राजकारणात उतरलो आहोत. संस्थानकाळात खेमसावंतांनी वसवलेली ही सुंदरवाडी… ३५० वर्षांचा इतिहास लाभलेलं शहर. मोती तलाव असो वा राजवाडा, या सर्व ऐतिहासिक वास्तू सावंतवाडीकरांच्या आहेत आणि कायम राहतील,” अशी भावना भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले यांनी व्यक्त केली.
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ गांधी चौकात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या वक्तव्याला मोठा प्रतिसाद मिळाला.
“आरोग्य आणि ड्रेनेजची समस्या १०० टक्के सोडवणार”
लखमराजे भोंसले म्हणाले,
“राजघराण्याच्या काळात आरोग्य, ड्रेनेज, पाणीपुरवठा यांसारख्या अत्यावश्यक सुविधा सुरू झाल्या. मात्र नंतर त्या क्षेत्रात हवी तशी प्रगती झाली नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला ती संधी मिळाली आहे. आरोग्य सेवा आणि ड्रेनेजच्या समस्या आम्ही पूर्णपणे सोडवणार आहोत.”
त्यांनी पुढे सांगितले की, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले या सामान्य घराण्यातील असून, त्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नांची उत्तम जाण आहे.
“लोकांनी राजमाता, राणी हा मान आम्हाला दिला. जमीन–पैसा येतात-जातात; पण लोक कायम सोबत राहतात, हेच आमचं भाग्य. आमच्या पिढ्यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम केले. अनेक प्रकल्पांसाठी जमीन दिली. अजूनही आम्ही देण्यास तयार आहोत. कारण लोकसेवा हा आमचा हेतू आहे.”
“सावंतवाडीकरांसाठी २४ तास… तुमच्या अडचणी म्हणजे आमच्या अडचणी”
लखमराजे म्हणाले,
“आम्ही तुमच्यासाठी दिवसरात्र उपलब्ध आहोत. नगरपरिषदेतही बसू, पण तुमच्या घरापर्यंत पोहोचून समस्या ऐकू. तुमच्या अडचणी आमच्या अडचणी आहेत आणि त्यांचे समाधान हेच आमचे ध्येय आहे.”
पुढील पाच वर्षांत सावंतवाडीचा चेहरा बदलण्याचे व अधिक प्रगत, आधुनिक आणि पर्यटननिष्ठ शहर उभारण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
“ऐतिहासिक वास्तूंचे रक्षण आणि संवर्धन हेच ध्येय”
राजघराण्याने संस्थान काळात दिलेला वारसा पुढे नेताना ते म्हणाले —
“मोती तलाव, राजवाडा किंवा इतर ऐतिहासिक वास्तू या राजघराण्याच्या नाहीत, त्या सावंतवाडीकरांच्याच आहेत. त्यांचे जतन व संरक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
शहरातील विविध शैक्षणिक संस्था व प्रकल्पांसाठी राजघराण्याने विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिल्याची आठवणही त्यांनी करून दिली.
“यापुढेही जनतेच्या हिताच्या कोणत्याही उपक्रमासाठी आम्ही जमीन देऊ,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपस्थित मान्यवरांचे जोरदार समर्थन
गांधी चौकातील प्रचारसभेस भाजप पदाधिकाऱ्यांची प्रभावी उपस्थिती होती. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सौ. श्रद्धाराजे भोंसले, लखमराजे भोंसले, विशाल परब यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
सभेतील उत्साह आणि जनताजनार्दनाचा प्रतिसाद पाहता, सावंतवाडीतील राजकीय वातावरण भाजपच्या बाजूने झुकत असल्याची स्पष्ट चाहूल यावेळी लागली.







