सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोसले यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, “सावंतवाडीकरांनी मला केवळ सून म्हणूनच नव्हे तर बहिण आणि मुलगी म्हणून स्वीकारले आहे. हा स्नेह आणि विश्वासच माझ्या विजयाची ताकद आहे,” असे त्या म्हणाल्या.
भाजपने सावंतवाडीतून निवडणुकीची संधी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि युवराज लखमराजे भोसले यांचे आभार मानले. प्रचारादरम्यान मिळणारे प्रेम आणि समर्थन पाहता आपला विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
“विकसित सावंतवाडी ही माझी जिद्द”
प्रचारसभेत बोलताना श्रद्धाराजे भोसले म्हणाल्या, “येथील जनता मला मनापासून आशीर्वाद देत आहे, तीच माझी खरी ताकद आहे. सावंतवाडीच्या विकासाचे स्पष्ट व्हिजन आम्ही घेऊन जनतेसमोर जात आहोत.”
त्या पुढे म्हणाल्या, “राजेसाहेब रघुनाथ महाराजांनी शहराच्या ड्रेनेज सिस्टीमसह अनेक मूलभूत सुविधांचे दूरदृष्टीपूर्ण नियोजन केले होते. आता नगराध्यक्ष म्हणून त्या वारशाला पुढे नेत टाऊन प्लॅनिंग, रोजगारनिर्मिती, आरोग्य सुविधा, पर्यटन आणि नागरिकांसाठी आधुनिक मनोरंजनात्मक सुविधा उभारण्यासाठी माझा सातत्यपूर्ण प्रयत्न राहील.”
रोजगार आणि महिला सक्षमीकरणावर विशेष भर
हॉटेल मॅनेजमेंट आणि बिझनेस मॅनेजमेंटच्या शिक्षणामुळे रोजगार निर्मितीच्या संधी वाढवण्यासाठी आपण सक्षमपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“महिला व युवकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी खास उपक्रम राबवणार आहे. सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांसह स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत स्थान मिळावे यासाठी नियोजन करणार,” असे त्यांनी नमूद केले.
“राजघराण्याचा वारसा… आणि नवीन सावंतवाडी”
आपल्या ओळखीबद्दल बोलताना श्रद्धाराजे म्हणाल्या,
“मी सावंतवाडीची सुन असल्याचा मला अभिमान आहे. राजघराण्याचा वारसा जपत आधुनिक विकासाकडे जाणारी सावंतवाडी उभी करण्याची माझी जिद्द आहे. राजकारणात नवीन असले तरी समाजाच्या विश्वासाने आणि भाजपच्या पाठिंब्याने पाच वर्षांत सावंतवाडीचा कायापालट करून दाखवणार आहे.”
शेवटी, सावंतवाडीकरांना आवाहन करत त्यांनी सांगितले —
“तुमच्या आशीर्वादातूनच परिवर्तन घडेल. मला आणि आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करा.”







