सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीचा तापलेला प्रचार आज निर्णायक वळणावर पोहोचला असून, ही निवडणूक सावंतवाडीच्या अस्मितेची, प्रतिष्ठेची आणि स्वाभिमानाची असल्याचे प्रभावी उद्गार राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले. गांधी चौकात झालेल्या भाजपच्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी राजघराण्याच्या योगदानाची कृतज्ञतापूर्वक परतफेड करण्याची ही वेळ आहे, असे सांगत श्रद्धाराजे भोसले व भाजप पॅनेल यांना भरभरून आशीर्वाद देण्याचे आवाहन नागरिकांना केले.
🔶 “सावंतवाडीचं स्वरूप घडवणाऱ्या राजघराण्याची परतफेड करण्याची वेळ”
राणे म्हणाले की, सावंतवाडी शहराचा पाया आणि विकास संस्थानकाळातच राजघराण्याने घातला. त्या काळात रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य यांसारख्या मूलभूत गरजांसाठी केलेली दुरदृष्टी आजही जाणवते.
“त्या काळी राजघराणे नसते तर आज सावंतवाडीची परिस्थिती काय असती? हे योगदान विसरू नका,” असे भावनिक आवाहन करत त्यांनी श्रद्धाराजे भोंसले यांना दिलेली संधी ही राजघराण्याविषयीचा सन्मान असल्याचे स्पष्ट केले.
🔶 “राजघराणं संपलं म्हणणाऱ्यांना सावंतवाडीकर उत्तर देतील”
सभेत प्रतिस्पर्ध्यांच्या विधानांवरही त्यांनी दादागिरीने प्रत्युत्तर दिले.
“राजघराणं संपलं म्हणणाऱ्यांनी याच राजघराण्यापुढे पूर्वी आशिर्वाद मागताना हा शब्द का आठवला नाही? सावंतवाडीकर यांना हे सर्व लक्षात आहे,” असे ते म्हणाले.
घरातील माता-भगिनींचा, परंपरेचा आणि शहराच्या स्वाभिमानाचा अपमान करणाऱ्यांविरुद्ध जनता ठामपणे उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
🔶 दीपक केसरकरांवर सूचक टीका
आ. दीपक केसरकर यांनी श्रद्धाराजेंना पाठिंबा दिला नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त करताना त्यांनी म्हटले—
“राजघराण्याच्या आशीर्वादाशिवाय न बोलणारे केसरकर आज शांत का? मात्र राजकारण म्हणून त्यांचा उमेदवार असेल, पण मनाने ते श्रद्धाराजेंच्याच बाजूने आहेत. अंदर की बात है — दीपक केसरकर हमारे साथ हैं,” असे विधान सभेत खळबळ उडवून गेले.
🔶 निधीच्या चाव्या माझ्या खिशात — नितेश राणे
कणकवलीतील उदय सामंतांच्या भाषणावर टोला लगावत त्यांनी म्हटले—
“निधीसाठी तुम्ही शेवटी पालकमंत्र्याकडेच जाणार, तर बायपास कशाला? थेट माझ्या सहकाऱ्यांनाच मतदान करा. निधीच्या चाव्या माझ्या खिशात आहेत; आचारसंहितेमुळे त्यांना सध्या हात घालू शकत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
🔶 आरोग्य क्षेत्रासाठी मोठी घोषणा
सावंतवाडीतील आरोग्यसेवेची गंभीर दखल घेत त्यांनी महत्त्वाची घोषणा केली—
- उपजिल्हा रुग्णालयासाठी स्पेशालिस्ट पर्मनंट डॉक्टर
- अत्याधुनिक मशिनरीची उपलब्धता
- गोवा-बांबोळीला जाण्याची गरज कमी करणे
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा निर्णय चर्चेतून आणि स्थानिक डॉक्टरांच्या मागण्यांचा विचार करून सोडवला जाईल, असे त्यांनी सांगितले.
“राजघराणे आमच्या सोबत आहे, त्यामुळे जमिनीचा प्रश्नच राहणार नाही,” असेही त्यांनी जाहीर केले.
🔶 “भाजपला तीनदा कमळ दाबा — विकासाची जबाबदारी माझी”
शेवटी त्यांनी नागरिकांना थेट आवाहन केले—
“आय लव्ह सावंतवाडी म्हणणाऱ्यांनी राजघराण्याविरोधात बोलणाऱ्यांना योग्य धडा शिकवा. फक्त श्रद्धाराजे नव्हे, तर भाजपचे संपूर्ण पॅनेल निवडून द्या. तुमच्या सर्वांगीण विकासाची पूर्ण जबाबदारी मी घेतो,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
सावंतवाडीचे राजकारण आता नव्या टप्प्यात प्रवेश करत असून राजघराण्याचा सन्मान, शहराचा स्वाभिमान आणि भाजपचा व्यापक विकासदृष्टिकोन याभोवती ही निवडणूक निर्णायक बनली आहे.







