मालवण नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठमध्ये उबाठा शिवसेनेचे उमेदवार मंदार सुहास ओरसकर आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या सौ. रुपाली सकपाळ फर्नांडीस यांचा प्रचार जोरात सुरू असून नागरिकांकडून दोघांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
युवासेनेतील पदाधिकारी म्हणून काम करत असलेल्या मंदार ओरसकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग आठसह संपूर्ण मालवण शहरात सामाजिक आणि विकासात्मक कामांमध्ये सातत्याने सहभाग नोंदवला आहे. “मालवणच्या पुढील पन्नास वर्षांच्या विकासाचे स्पष्ट व्हिजन घेऊन मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे. प्रभागाचा आणि शहराचा सर्वंकष विकास हेच माझे ध्येय आहे,” असे मत व्यक्त करून त्यांनी विजयाबाबत पूर्ण विश्वास दर्शविला.
प्रभाग आठमधील नागरिकांशी नियमित संपर्क, बाजारपेठेचा व्यापक भाग, व्यवसायिकांची गरज, सुविधा आणि भविष्यातील शहररचनेबाबत ओरसकर यांनी सविस्तर चर्चा करून मतदारांचा विश्वास संपादन केला आहे. मालवणच्या व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी हा प्रभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याने येथील पायाभूत सुविधांच्या उभारणीला ते प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रभाग 8A मधून मंदार ओरसकर तर 8B मधून काँग्रेसच्या सौ. रुपाली सकपाळ फर्नांडीस मैदानात असून दोघेही घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. नागरिकांशी सातत्यपूर्ण संवाद आणि विकासनिष्ठ भूमिका यामुळे दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराला ओढा मिळत असल्याचे स्थानिक मतदारांनी सांगितले.
प्रचारा दरम्यान ओरसकर म्हणाले, “उबाठा शिवसेनेच्या माध्यमातून जबाबदारी सांभाळताना आम्ही या प्रभागात अनेक उपक्रम राबवले. नागरिकांच्या समस्या वेळेवर सोडवण्यासाठी आणि प्रभागाला आधुनिक स्वरूप देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
मालवण नगरपालिका निवडणुकीत प्रभाग आठ विकासाभिमुख निवडीकडे वाटचाल करीत असल्याचे वातावरण दिसत आहे.







