मालवण नगरपालिका निवडणुकीत प्रभाग सात ‘अ’ मध्ये उबाठा शिवसेना उमेदवार तेजस नेवगी यांनी अक्षरशः प्रचारात धडाकाच लावला आहे. पहिल्याच फेरीत घराघरांत जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतानाच त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वतः उपस्थित राहून तेथील रहिवाशांशी संवाद साधत अनोखी नोंद केली — किल्ल्यावर जाऊन प्रत्यक्ष प्रचार करणारे ते या निवडणुकीतील पहिले उमेदवार!
नेवगी म्हणाले, “प्रचारासाठी वेळ कमी असला तरी एकाही मतदाराला वंचित ठेवणार नाही. प्रत्येकाच्या दारात जाऊन विकासाच्या माझ्या संकल्पना स्पष्टपणे मांडत आहे.”
प्रभाग सात हा मालवणच्या पर्यटनाचा मुख्य ‘हॉटस्पॉट’ असल्याने मोठमोठी आश्वासने न देता — ट्रान्सफॉर्मर, स्ट्रीटलाईट, बंदिस्त गटारे, स्वच्छता, सुशोभीकरण आणि उत्कृष्ट रस्ते या अत्यावश्यक सुविधांवरच आपला भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रचारात उबाठा शिवसेनेच्या प्रभाग सात ‘ब’ च्या उमेदवार गौरी मयेकर आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पूजा करलकर यांनीही तगडी उपस्थिती लावत वातावरण अधिक रंगतदार केले. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी फौज सोबत होतीच.
तेजस नेवगी पुढे म्हणाले, “सर्वसामान्य ‘मालवणी तरुणा’वर विश्वास ठेवून उबाठा शिवसेनेने मला उमेदवारी दिली आहे. पर्यटन व्यवसायाला नवी उंची देण्यासाठी आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर, बंदिस्त गटारांची उभारणी, रॉक गार्डनच्या धर्तीवर सुशोभीकरण— ही माझी पहिली कामे असतील.”
यासोबतच बंदर-जेटी परिसरात सिंधुदुर्ग किल्ला रोखठोक दिसेल असा आकर्षक सेल्फी पॉईंट, तसेच प्रभागातील रस्त्यांचे संपूर्ण सुधारिकरण करण्याचाही त्यांचा संकल्प आहे.
“मी समाजकार्यासाठी सदैव पुढाकार घेत आलो आहे. आता नगरसेवक म्हणून जबाबदारी येणार असेल तर ती पार पाडण्यासाठी मी पूर्ण सज्ज आहे. जनतेकडून जितका जबरदस्त प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे सेवाभावाने काम करण्याची ताकद अधिक वाढते,” असे तेजस नेवगी यांनी आत्मविश्वासाने सांगितले.







