कणकवलीत काल झालेल्या कणकवली शहर विकास आघाडीच्या काँर्नर सभेला मिळालेला अभूतपूर्व आणि अफाट उत्साह पाहून आगामी नगरपरिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट होत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांच्या तुफान प्रतिसादामुळे “कणकवली बदलाच्या निर्णायक क्षणात” असल्याची भावना आणखी दृढ झाली आहे.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री. संदेश भास्कर पारकर यांच्या सभेला उसळलेली गर्दी, घोषणांचा जल्लोष आणि नव्या नेतृत्वावरील विश्वास—या सर्वांनी कणकवलीत परिवर्तनाची लाट अधिक प्रबळ केल्याचे चित्र होते. भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त कणकवली ही केवळ घोषणा नसून जनतेची ठाम मागणी आहे, आणि सभेत उमटलेला प्रतिसाद हे त्याचे स्पष्ट द्योतक ठरले.
या कार्यक्रमाला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, उपनेते संजय आंग्रे, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर, आनंद पिळणकर तसेच शहर विकास आघाडीचे सर्व नगरसेवक उमेदवार आणि मोठ्या संख्येने कणकवलीकर उपस्थित होते.
सभेत व्यक्त झालेल्या भूमिकांमुळे आणि मिळालेल्या उत्साहामुळे शहराच्या विकासासाठी नव्या नेतृत्वाची गरज असल्याची भावना अधिक बळकट झाली आहे. कणकवली शहर विकास आघाडीचा वाढता जनसमर्थनाचा प्रवाह पाहता नगरपरिषद निवडणुकीची लढत अधिक रंगतदार होण्याचे संकेत मिळत आहेत.







