मालवण | मालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भाजपचा प्रचार वेग घेत आहे. प्रभाग क्रमांक 1 मधील भाजपा उमेदवार मंदार केणी आणि दर्शना कासवकर यांच्या धुरीवाडा येथील प्रचार कार्यालयाचे उदघाटन आज राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेशजी राणे यांच्या हस्ते संपन्न झाले.
उदघाटनावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती दिसून आली. या प्रसंगी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी जाहीर झालेल्या सौ. शिल्पा खोत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शहराध्यक्ष बाबा मोंडकर, तसेच पक्षाचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये नवीन उत्साह पाहायला मिळाला. भाजपाच्या उमेदवारांना प्रभागातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून येणाऱ्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मध्ये भगवा फडकवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
मंत्री नितेश राणे यांनी या वेळी मालवण शहराच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे सांगत उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. आगामी दिवसांत प्रचार अधिक जोमाने राबवण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.







