मुंबईतील प्रारूप मतदार यादीतील मोठ्या घोळावर शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दीड महिन्यापूर्वीच वरळीतील सभेत हा मुद्दा सर्वांसमोर आणला होता, तर आता या घोळावर सर्वच विरोधी पक्ष आवाज उठवत असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी हरियाणा आणि बिहारमधील मतदार यादीतील समस्यांचा अभ्यास सुरू केल्याचेही त्यांनी नमूद केले.
१ जुलै २०२५ ची मतदार यादी ग्राह्य धरल्यामुळे नवे मतदार मतदानापासून वंचित राहणार, अशी गंभीर बाब आदित्य ठाकरे यांनी मांडली. प्रारूप यादी वेळोवेळी पुढे ढकलण्यात आली—७, नंतर १४ आणि शेवटी २० तारखेला प्रसिद्ध झाली. मात्र, या यादी मशीन-रीडेबल नसल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला असून, अनेक ठिकाणी क्रमांकांमध्ये १ ते ५० हजारपर्यंत विसंगती आढळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
निवडणूक आयोगावर थेट टीका करत ठाकरे म्हणाले, “हे आयोग सत्ताधाऱ्यांच्या कार्यालयातून चालते. वार्ड कापण्याचंही त्यांना जमलं नाही. मतदार यादीत इतका घोळ करून ठेवला आहे की निवडणुका सेट केल्या जात असल्याचा भास होतो. मतं चोरी आणि चिटिंग सुरूच आहे.”
ते पुढे म्हणाले, “जर हे असंच सुरू राहणार असेल तर मग तुम्ही तुमच्यातच निवडणुका घ्या. आम्ही हरकती देणार आहोत, पण त्या भाजपकडून उत्तर मिळणार का की निवडणूक आयोग कारवाई करणार?”
निवडणूक आयोगाची अकार्यक्षमता आणि मुद्दाम घोळ करण्याची शक्यता त्यांनी अधोरेखित करत, “जाणीवपूर्वक केलं असेल तर देशहितासाठी देशद्रोहाचा खटला टाका,” अशी मागणीही केली.
“राज्य निवडणूक आयोगाकडे मतदार यादीतील घोळ आणि मत चोरीचे मुद्दे घेऊन जाणार आणि हा चोरीचा मोड मोडून काढणार आहोत,” असा ठाम निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.







