मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील १७ वर्षांपासून रखडलेले असून, कोकणकरांना कोणी वाली नाही अशी परिस्थिती आज स्पष्टपणे दिसून येत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. महामार्गावरील अनेक ठिकाणी उड्डाणपुलांची कामे अद्यापही अतिशय संथ गतीने सुरू असून, “यावर्षी तरी हा महामार्ग पूर्ण होणार का?” हा प्रश्न प्रत्येक कोकणकराच्या मनात आहे.
या सातत्यपूर्ण दिरंगाईमुळे आता कोकणी जनतेने एकत्र येऊन आवाज उठवणे अपरिहार्य झाले असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता संगमेश्वर येथे रास्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे की, राष्ट्रीय महामार्ग अडवणे हा कायद्याने गुन्हा आहे, याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. मात्र, १७–१८ वर्षे महामार्गाचे काम अडवून ठेवणे, वारंवार डेडलाईन देऊन जनतेची फसवणूक करणे हा गुन्हा नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आंदोलनानंतर राजकीय दबावाखाली आयोजकांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता असून, आयोजक म्हणून ते गुन्हे स्वीकारण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.
“हा लढा स्वार्थासाठी नाही, चोरी किंवा लबाडीसाठी नाही, तर जनतेच्या हक्कासाठी आणि सतरा वर्षे रखडलेल्या महामार्गासाठी आहे,” असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ४ डिसेंबर रोजीच राज्याचे मुख्यमंत्री, संबंधित यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाला लेखी सूचना देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. जर शासन-प्रशासनाची खरोखरच महामार्गाच्या कामाला गती देण्याची इच्छा असती, तर आज संगमेश्वरच्या उड्डाणपुलावर चार कर्मचारी नव्हे, तर शंभर कर्मचारी काम करताना दिसले असते, अशी तीव्र टीकाही यावेळी करण्यात आली.
सरकार, शासन आणि प्रशासनाने जाणीवपूर्वक कोकणकरांना वेठीस धरल्याचा आरोप करत, “होईल ते होईल, पण कोकणी जनता आता घाबरणार नाही,” असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. गेली तीन वर्षे शांततेच्या मार्गाने संघर्ष करण्यात आला, मात्र त्या मार्गाने न्याय मिळत नसेल तर आक्रमक भूमिका स्वीकारणे अपरिहार्य असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
“११ जानेवारी २०२६ – संगमेश्वर – रास्ता रोको”
हे केवळ आंदोलन नाही, तर कोकणकरांच्या संयमाचा गंभीर इशारा आहे, असा ठाम संदेश या आंदोलनातून देण्यात आला आहे.





