मालवण नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने आपल्या प्रचाराची गती वाढवत आज मालवण येथील टोपीवाला हायस्कुल येथे भव्य प्रचार सभेचे आयोजन केले. या सभेस भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी मालवणच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप सक्षम पर्याय असल्याचे मतदारांपुढे ठामपणे मांडले.
सभेदरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे यांनी, “विकास हाच आमचा एकमेव अजेंडा आहे. त्याच आधारावर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत,” असा ठाम विश्वास व्यक्त केला. मालवणच्या भविष्यासाठी नियोजनबद्ध कामे, पायाभूत सुविधा, पर्यटनवाढ आणि तरुणांना संधी यावर केंद्रित स्पष्ट दृष्टी भाजपकडे असल्याचे त्यांनी सांगितले.
या सभेत वायंगणीच्या उपसरपंच समृद्धी आसोलकर यांसह मालवण नगरपरिषद प्रभाग क्रमांक ९ मधील अनेक नागरिकांनी भाजपा प्रवेश करून पक्षाला बळकटी दिली. या नव्या प्रवेशामुळे प्रभागात भाजपचा जनाधार आणखी मजबूत झाल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार अजित गोगटे, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार सौं. शिल्पा यतीन खोत, जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, संध्या तेरसे यांसह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेतील जनसमुदायाचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकीत भाजपकडून कडवे आव्हान निर्माण होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.







