मालवण नगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार निलेश राणे यांनी दिलेल्या विशेष मुलाखतीत शहर विकासावर अत्यंत थेट आणि स्पष्ट भूमिका व्यक्त केली. खासदार नारायण राणे यांच्या लाडक्या मालवण शहराला आगामी काळासाठी तोच दिमाख मिळवण्यासाठी शिवसेना आमदार निलेशजी राणे यांनी शहर विकास आराखडा, मालवणची सद्यस्थिती आणि पुढील दिशा यावर मनमोकळा संवाद साधला.
“फक्त घोषणा नकोत… अबोल शब्दांचे कृतीत रूपांतर केलेच पाहिजे!”
मालवण शहराचे भवितव्य उंचावण्यासाठी कोणताही विकास लोकांच्या डोक्यावर लादला जाणार नाही, असे सांगत आमदार राणे म्हणाले—
“मालवण शहर हे एकविसाव्या शतकातील शहर वाटले पाहिजे. विकास लोकांना त्रास देणारा नसून सर्वसमावेशक आणि नागरिकहिताचा असावा, यावर आमचा भर आहे.”
शहराच्या गरजांना प्राधान्य देत त्यांनी सांगितले की मालवणचा तयार केलेला विकास आराखडा जनतेच्या हिताचे भान ठेवूनच पुढे नेला जाणार आहे.
शिवसेनेची लढाई विकासाच्या अजेंड्यासह — तीन नगरपालिकांत स्वतःच्या बळावर
जिल्ह्यातील कणकवली, मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडी येथील निवडणुकांचा उल्लेख करत ते म्हणाले—
“मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ला येथे आम्ही स्वबळावर आहोत. कणकवलीत शहर विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. आमचा एकमेव अजेंडा — विकास!”
येत्या काही दिवसांत मालवण आणि कणकवलीसह सर्व शहरांचा सविस्तर विकास आराखडा तसेच पक्षाचा जाहीरनामा जनतेसमोर ठेवला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
“विकास आराखडा म्हणजे फक्त मोठे प्रकल्प नव्हे… छोट्या गोष्टींनाही तितकेच महत्त्व”
शहर विकासाची संकल्पना उलगडताना आमदार राणे म्हणाले :
- नागरिकांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचल्या पाहिजेत
- नगरविकास खात्यांतर्गत मोठा निधी मिळण्याची संधी
- पर्यटन स्थळांना तीर्थक्षेत्रांप्रमाणेच निधी मिळावा
- घनकचरा व्यवस्थापन, क्रीडा संकुल, नाट्यगृह, किनाऱ्यावरील बंधारे तातडीचे
- वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंग रोड किंवा बायपासची आवश्यकता
- भटक्या कुत्र्यांवर उपाय म्हणून निर्बीजीकरण मोहीम
- नळपाणी योजनांचा आढावा घेऊन पूर्णत्वाला नेणे
- रॉक गार्डन, दांडी, चिवला किनारा सुशोभीकरण
- पर्यटन आणि मच्छिमारांचे हित जपणारी दुहेरी व्यवस्था
“एका घरालाही त्रास होणार नाही. आम्ही कोणालाही उद्ध्वस्त करून विकास करणार नाही,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
‘गत निवडणुकीतील गोंधळ पुन्हा निर्माण होऊ देणार नाही’ — आराखड्यातील त्रुटी दुरुस्तीची भूमिका
पूर्वीच्या विकास आराखड्यावर झालेल्या वादांचा उल्लेख करत ते म्हणाले—
“मागीलवेळी मालवण शहर विकास आराखड्याभोवती गोंधळ झाला, लोकांना मानसिक त्रास झाला. ते चित्र पुन्हा निर्माण होऊ देणार नाही. त्रुटी दुरुस्त करूनच आराखडा अंमलात आणू.”
या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचे आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील, असे त्यांनी विश्वासाने सांगितले.
१०० कोटी निधी पडून असल्याच्या आरोपांवर जोरदार उत्तर
वैभव नाईक यांच्या आरोपांवर उत्तर देताना त्यांनी टोकदार वक्तव्य केले—
“निधी कोणत्या हेडखाली जमा होतो हे नाईक यांनी सांगणे गरजेचे होते. मंत्रालयाने पैसा पाठवला आणि कोणीतरी थांबवला असे होऊच शकत नाही. दहा वर्षे आमदार राहून अशी किरकोळ टीका करणे शोभणारे नाही.”
“नगरपालिका म्हणजे मंदिर — इथे अपवित्रता असू नये”
उमेदवारांविषयी बोलताना आमदार राणे अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाले—
- आमचे उमेदवार पारदर्शी, स्वच्छ आणि निष्कलंक
- काही उमेदवार नवीन असले तरी शहराविषयी स्पष्ट व्हिजन
- स्वतःचा फायदा नाही, तर शहराचा विकास हा उद्देश
- नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. ममता वराडकर शांत, संयमी व स्वच्छ प्रतिमेच्या
“नगरपालिका हे मंदिर आहे. तिथे फक्त शुद्ध मनाचे लोक काम करायला हवेत,” असे ते म्हणाले.
“मालवणला आधुनिक, स्वच्छ, सुंदर आणि सर्वसमावेशक शहर बनवण्यासाठी आम्हाला संधी द्या. आमच्या नगराध्यक्षासहित सर्व उमेदवारांना विजयी करा आणि मालवण नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा पुन्हा फडकवा.” – आमदार निलेश राणे







