पेण | २२ नोव्हेंबर (देवा पेरवी)
पेण नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप राष्ट्रवादी आघाडीचा विजय निश्चित असल्याचा ठाम दावा आमदार रवीशेट पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. “देशभर उसळलेली भाजपाची लाट रोखणे विरोधकांच्या आवाक्याबाहेर आहे. बिहारमधील विजयानंतर हीच लाट महाराष्ट्रातील नगरपालिकांमध्येही दिसत आहे. पेणमधील विजयाची मालिका सुरू झाली असून ६ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. विरोधकांचा सुपडा साफ होणार हे चित्र स्पष्ट आहे,” असे ते म्हणाले.
आ. पाटील यांनी सांगितले की, २६ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पेणमध्ये जाहीर प्रचार सभा घेणार असून या सभेतून विजयाची धडाकेबाज सुरुवात होईल. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रितम पाटील यांच्यासह भाजप राष्ट्रवादी आघाडीचे १८ नगरसेवक दणदणीत विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या दहा वर्षांत पेण शहरात तब्बल ४०० कोटींची विकासकामे झाल्याचा आढावा देत पाटील म्हणाले, “आरसीसी रस्त्यांचे जाळे, शहर सुशोभीकरण, थोर पुरुषांच्या स्मारकांचे काम, सभागृह उभारणी अशा अनेक प्रकल्पांनी पेण शहराचा चेहरा बदलला आहे. पुढील काळात ही कामे दुपटीने वाढणार आहेत.”
पेण शहराच्या पाणीपुरवठा योजनेबाबतही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. १६४ कोटींच्या नव्या योजनेला निधी मिळणार असून १५ एमएलडीचे नवे जलशुद्धीकरण केंद्र उभारले जाणार आहे. हेटवणे–आंबेघर धरणातून ५ दलघमी पाणी शहरासाठी आरक्षित करण्यात आले आहे. तसेच जुने नाट्यगृह पाडून आधुनिक नाट्यगृह बांधण्याचे नियोजन सुरू असून वाढत्या पार्किंग समस्येवरही पर्यायी उपाय शोधले जात आहेत.
पाटील म्हणाले, “पेण अर्बन बँकेत ठेवलेले पालिकेच्या पाणी योजनेचे पैसे बुडले होते, तरीही आम्ही विकासकामांसाठी निधीची कमतरता जाणवू दिली नाही. मोदी–फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सबका साथ, सबका विकास या ब्रीदावर काम होत आहे. आगामी ३ डिसेंबर रोजी हा दैदिप्यमान विजय पुन्हा एकदा पेणकर अनुभवतील.”
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला बिनविरोध निवडून आलेल्या ६ नगरसेवकांचा आमदार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रितम पाटील, अनिरुद्ध पाटील, बाळासाहेब जोशी, मिलींद पाटील, ललित पाटील, संजय डंगर, रविंद्र म्हात्रे, शोमेर पेणकर, जितेंद्र ठाकूर यांसह आघाडीचे सर्व १८ उमेदवार आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.







