मालवण नगरपालिका निवडणुकीत प्रभाग ३ मध्ये शिवसेनेकडून उमेदवार म्हणून उभे असलेले दीपक पाटकर हे गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागातील ओळखीचे, विश्वासार्ह आणि कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय नाव. सातत्याने प्रभागात काम करताना त्यांनी रस्ते, पाणी, ड्रेनेज व स्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे. जनसहभाग, नेत्यांचा विश्वास आणि शिवसैनिकांचा उत्साह लक्षात घेऊन आम्ही त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि प्रभाग ३ च्या विकास, स्पर्धा आणि भावी योजना यावर त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला.
प्रश्न – तुमचा प्रभाग क्रमांक तीन म्हणजे देऊळवाडा आडारी ही देवभूमी आहे. इथल्या मतदाराचा प्रतिसाद कसा आहे.
दीपक पाटकर:
हो, निश्चितच वातावरण सकारात्मक आहे. प्रभाग ३ हा शिवसेनेचा गड आहे, पण गड राखण्यासाठी काम हवे, पण ही मालवणची देवभूमी आहे. तिला जपायला हवे, पुजायला हवे आणि मुख्य म्हणजे इथे तुमची प्रत्यक्ष उपस्थिती हवी, आणि लोकांशी नाळ हवी—हे आम्ही वर्षानुवर्षे जपलं आहे. यंदाही लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतोय. माझ्यासोबत नीना मुंबरकर यांना मिळणारा पाठिंबा हे कामगिरीचेच फलित आहे.
प्रश्न – तुमच्यावर ‘कार्यसम्राट’ अशी प्रतिमा आहे. नागरिकांनी नेमक्या कोणत्या कामांना सर्वाधिक प्रतिसाद दिला आहे?
दीपक पाटकर:
रस्ते सुधारणा, नाले–दुरुस्ती, पाणीपुरवठा या मूलभूत कामांना लोकांनी सर्वाधिक दाद दिली.
प्रभागातील अनेक छोटेमोठे प्रश्न पावसाळ्यात पाणी तुंबणे, दिव्यांची सोय , कचऱ्याची नियमित उचल ही लोकांच्या रोजच्या जीवनावर थेट परिणाम करतात. मी ही कामं वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. लोक आज म्हणतात की “काम झालंय”—हेच आमचं सर्वात मोठं बक्षीस आहे. दीपक आमच्या हक्काचो माणूस हा ही इथल्या प्रभागाने मला दिलेली ओळख आहे. आणि तीच ओळख माझे मताधिक्क्य ठरणार आहे.
प्रश्न – विरोधकांकडून टीका किंवा स्पर्धा याबद्दल काय म्हणाल?
दीपक पाटकर:
स्पर्धा असलीच पाहिजे; लोकशाही आहे. विरोधक टीका करतात, काही मुद्दे उपस्थित करतात—हे त्यांचं कर्तव्य. पण माझा विश्वास असा आहे की टीकेला उत्तर देण्याची गरज नसते, कामच उत्तर देतं.
मागील अनेक वर्षांपासून लोक माझ्या पाठीशी उभे आहेत. कारण त्यांनी काम पाहिलं आहे, संपर्क अनुभवला आहे, आणि सातत्य जाणवलं आहे.
प्रश्न – आमदार निलेश राणे यांच्या कामाचा धडाका यामुळे तुमचा प्रचार अधिक सोपा झाला आहे.
दीपक पाटकर: अर्थातच खासदार नारायण राणे यांच्या आशीर्वादातून आमचे राजकिय जीवनाची सुरुवात आहे. त्यांचे आशीर्वाद कायमच आहेत पण यावेळेस सोबत आमदार निलेश राणे यांच्या कामाचा धडाका मालवणला एका नव्या उंचीवर नेणारा ठरतोय. नुकतेच मालवणच्या विकासाचा अष्टसूत्री संकल्प असलेल्या व्हिजन डॉक्युमेंटचे आमदार निलेश राणे यांच्याकडून सादरीकरण करण्यात आलं त्याला संपूर्ण मालवणकरांनी प्रचंड प्रतिसाद दिलाय. शिवसेना हाच या शहराचा विकासाचा तारणहार आहे यांची खात्री मालवणच्या जनतेला पटले आहे. त्यामुळे निलेशजीच्या व्हिजनला पुढे नेण्यासाठी मालवणकर शिवसेनेला सर्वच प्रभागासह नगराध्यक्षपदासाठी ममता वराडकर यांनाच कौल देतील.
आमदार निलेशजी राणे यांच्यासोबत जिल्हाप्रमुख दत्ताजी सामंत यांच्या फायरब्रँड नेतृत्व आणि वक्तृत्वामुळे माझ्यासह सर्व शिवसैनिकांना प्रचारात आणि निवडणूक जिंकण्याचा हुरुप आहे.
आमदार निलेशजी आणि दत्ता सामंत यांच्याकडून आम्हाला सतत मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळतो. विशेषतः मालवणातील पदाधिकारी, शिवसैनिक—ते सर्व प्रचारात आघाडीवर आहेत.
नेतृत्व एकत्र असलं, संघटना मजबूत असली की उमेदवारांची शक्ती वाढते. आमच्याकडे दोन्ही आहेत.
प्रश्न ६ – आगामी पाच वर्षांसाठी तुमच्या प्रमुख योजना कोणत्या?
दीपक पाटकर:
आमचा अजेंडा स्पष्ट आहे—सुंदर, सुरक्षित आणि सुसज्ज प्रभाग ३.
- उर्वरित रस्त्यांचे काँक्रीटीकरण
- आधुनिक मलनिस्सारण योजना
- स्वच्छतेसाठी डिजिटल मॉनिटरिंग
- महिलांसाठी सुविधा—आरोग्य व प्रशिक्षण उपक्रम
- युवकांसाठी क्रीडा सुविधा आणि मैदानांची उभारणी
- सार्वजनिक उद्यानांचे नूतनीकरण व प्रकाशयोजना
- स्मार्ट प्रभाग संकल्पना – सीसीटीव्ही, सुरक्षित रस्ते, स्वच्छता सुधारणा
प्रभागाचा चेहरामोहरा बदलायचा हे आमचं ध्येय आहे.
प्रश्न ७ – मतदारांना शेवटी काय संदेश द्याल?
दीपक पाटकर:
मी नेहमी सांगतो—निवडणुकीत नव्हे, वर्षभर लोकांच्या दारात राहणं महत्त्वाचं.
हे काम आम्ही प्रामाणिकपणे केलं.आता पुढील पाच वर्षांत प्रभाग ३ ला नवा आयाम देण्यासाठी तुमचे आशीर्वाद हवेत.
शिवसेनेवर, आमच्यावर ठेवलेला विश्वास दुप्पट परत फेडू हेच माझे वचन आहे.
प्रभाग क्रमांक तीन मध्ये मी तुमचा दीपक पाटकर धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. माझ्यासोबत नीना मुंबरकर आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर या तिघांनाही धनुष्यबाण चिन्हावर मत देऊन मालवणच्या विकासपर्वात सहभागी होऊन आमदार निलेश राणे यांचे हात बळकट करुया..







