सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीची रंगत चढत असताना भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी आज केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांची भेट घेत राजकीय कारकिर्दीसाठी आशीर्वाद घेतले. निवडणूक प्रचाराच्या निर्णायक टप्प्यावर मिळालेला हा पाठिंबा भाजपच्या स्थानिक संघटनेसाठी महत्त्वाचा ठरत आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे ,भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी हे ही उपस्थित होते.
या भेटीदरम्यान श्रद्धाराजे भोसले यांनी सावंतवाडी शहरातील प्राधान्याच्या विकासकामांबाबत, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पर्यटनविकास याबाबत राणे यांना सविस्तर माहिती दिली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षाच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेल, असा विश्वास राणे यांनी यावेळी व्यक्त केल्याचे समजते.
नगराध्यक्षपदासाठी भाजपने राजघराण्याची सून असलेल्या श्रद्धाराजे भोसले यांच्यावर विश्वास दाखवल्यानंतर, राणेंचा अधिकृत पाठींबा मिळाल्याने भाजपच्या निवडणूक यंत्रणेला बळकटी मिळाल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. श्रद्धाराजे यांच्या प्रचाराला यानंतर अधिक गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







