मालवण नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची मोहीम वेग घेत असताना प्रभाग क्रमांक ८ चे शिवसेना उमेदवार राजन परुळेकर आणि शर्वरी पाटकर यांच्या गवंडीवाडा येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते, तर जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले, “मालवणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे नगराध्यक्षपद तसेच सर्व २० उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील. वर्षभर जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केलेले नियोजन आणि माझ्याकडून आमदार म्हणून सातत्याने राबविलेली कामे—याच बळावर आम्ही मतदारांच्या दरवाजात जात आहोत.”
ते पुढे म्हणाले, “ही निवडणूक वैचारिक, विकासाभिमुख आणि जनतेच्या गरजांशी निगडित अशा अजेंड्यावर लढवित आहोत. नगरपालिका मिळाल्यानंतर नागरिकांना कोणत्या सुविधा, पायाभूत सुविधा आणि शहर विकासाच्या कोणत्या योजना मिळणार आहेत, याचा परिपूर्ण आराखडा तयार करूनच आम्ही मते मागत आहोत.”
शहरातील नागरिकांचा समर्थनाचा वाढता कल पाहता शिवसेनेची निवडणूक मोहीम दिवसेंदिवस अधिक भक्कम होत असल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांनी सांगितले. प्रभाग ८ मध्ये परुळेकर आणि पाटकर यांच्या प्रचाराला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असून स्थानिक कार्यकर्त्यांत विजयाचा आत्मविश्वास दिसून येत आहे.







