“माझ्यावर जेव्हा राजकीय संकटे ओढवली, तेव्हा सावंतवाडीकरच धावून माझ्या पाठीशी उभे राहिले,” अशा भावनिक शब्दांत माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडीकरांचे आभार मानले. तीन वेळा आमदार आणि मंत्रीपद मिळवून दिल्याचे श्रेय सावंतवाडीच्या जनतेलाच देत त्यांनी आगामी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
ते तब्येतीच्या कारणामुळे प्रचारात सक्रिय नसल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, “मी आजारी असताना कोणी चुकीची माहिती पसरवत असेल, चुकीची विधाने करत असेल तर ते नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे. गैरसमज पसरवू नयेत.”
“आमच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार ॲड. निता सावंत-कविटकर यांनाच सावंतवाडीकरांनी मतदान करावे,” अशी त्यांनी भावनिक हाक दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी विरोधकांच्या हालचालींवर भाष्य करत सांगितले,
“माझ्या विरोधात कटकारस्थान झाले की सावंतवाडीकरच ताकदीने माझ्या मागे उभे राहतात. आता पुन्हा मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न होत असला तरी जनता उत्तर देईल.”
ते पुढे म्हणाले—
▪️ “युती झाली असती तर मी राजघराण्याला पाठिंबा दिला असता. परंतु आता प्रश्न येत नाही. आमच्या उमेदवारांनाच मतदान व्हावे.”
▪️ “शहराला असा नगराध्यक्ष हवा जो २४ तास जनतेला भेटेल, समस्या सोडवेल, सहज उपलब्ध असेल.”
▪️ “एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून सावंतवाडीसाठी भरघोस निधी मिळतो आहे. ते लवकरच सावंतवाडीत येणार आहेत.”
जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याबाबत बोलताना केसरकर म्हणाले की, संजू परब सक्षम नेतृत्व आहे आणि विरोधकांचे प्रयत्न ते हाणून पाडतील, असा आपला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड. निता सावंत-कविटकर, शहरप्रमुख खेमराज (बाबू) कुडतरकर, माजी जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
परिषदेत मांडलेल्या भावनिक भूमिकेमुळे सावंतवाडीतील निवडणुकीचे वातावरण आणखी तापले असून शिवसेनेची एकजूट अधिक दृढ होत असल्याचे राजकीय वर्तुळात दिसून येत आहे.







