सावंतवाडीतील शिल्पग्राम येथे आयोजित बुद्धिजीवी, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या विचारसभेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दमदार भाषण करत अनेक महत्वाचे मुद्दे मांडले. या सभेत त्यांनी स्पष्ट आरोप केला की, आमदार दीपक केसरकर यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा काही जणांनी कुटील डाव रचला आहे. मात्र असा प्रयत्न करणाऱ्यांना सावंतवाडीकरांनी यापुढे योग्य ती जागा दाखवावी, असे ते म्हणाले.
सभेत बोलताना मंत्री सामंत म्हणाले की, “दीपक केसरकर शांत, संयमी आणि अभ्यासू नेतृत्व आहे. पण एवढं शांत राहणं कधी कधी राजकारणात उपयोगाचं नसतं. तरीही त्यांच्या केलेल्या कामांचा माझ्या राजकीय प्रवासातही महत्त्वाचा वाटा आहे.” सिंधू-रत्न मार्गावरील कामे, शहर विकासातील विविध उपक्रम हे केसरकर यांच्या नेतृत्वामुळे गतीमान झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच शहराच्या विकासाबाबत भाष्य करताना उदय सामंत म्हणाले —
▪️ “महाराष्ट्रातील विकास बघायचा तर सावंतवाडीत बघा.”
▪️ मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना लवकरच सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
▪️ मोती तलाव हा सावंतवाडीकरांचा अभिमान असून त्याला कोणतीही बाधा पोहोचू नये, असे स्पष्ट आवाहन त्यांनी केले.
याशिवाय जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या समर्थनार्थ बोलताना सामंत यांनी सांगितले की, “परब यांच्या मतदारसंघात वातावरण कोणतेही निर्माण झालं तरी ते निवडून येणारच.”
आडाळीत मोठे प्रकल्प लवकरच येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. आडाळीतील जमिनीच्या अधिक मोबदल्याची अट शिथिल करुन स्थानिकांना कमी किमतीत भूखंड उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासन पातळीवर सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
या सभेला आमदार दीपक केसरकर, संपर्क नेते राजेश मोरे, जिल्हाप्रमुख संजू परब, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नीता सावंत कविटकर तसेच शहरातील डॉक्टर, इंजिनियर, वकील, व्यापारी, प्राध्यापक आणि बुद्धिजीवी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता सावंतवाडीतील आगामी निवडणुकीची दिशा व वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.







