वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचारसभेला आज उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला. या सभेस भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे विशेष उपस्थित होते.
सभा संबोधित करताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, “विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. वेंगुर्लेचे अधिक आदर्श आणि स्मार्ट शहरात रूपांतर करण्यासाठी आमचे उमेदवार राजन गिरप आणि सर्व नगरसेवक उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा.”
मागील सत्ताकाळात केलेल्या विकासकामांची जंत्री जनतेसमोर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आगामी काळात नव्या नियोजनबद्ध कामांची अंमलबजावणी अधिक वेगाने होणार असल्याची ग्वाहीही यावेळी राणे यांनी दिली.
सभेला प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप उर्फ राजन गिरप, तसेच भाजपचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रचारसभेला मिळालेला उत्साह वेंगुर्लेतील निवडणूक वातावरण अधिक रंगतदार करणारा ठरला आहे.







