लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची यात्रा आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल एकाच दिवशी येत असल्याने या दोन्ही महत्त्वाच्या घटनांचे नियोजन सुरळीत पार पडावे, या दृष्टीने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सायंकाळी आंगणेवाडी येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत यात्रा काळातील वाहतूक, पाणीपुरवठा, वीज, दूरध्वनी सेवा, सुरक्षा व स्वच्छता यासंदर्भात विविध सूचना देण्यात आल्या.
आंगणेवाडी येथील भराडी देवी मंदिर परिसरात झालेल्या या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मालवण व कणकवलीकडून आंगणेवाडीच्या दिशेने होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. भाविक व व्यापाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून टँकर सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले. तसेच बीएसएनएल व खासगी मोबाईल कंपन्यांची दूरध्वनी सेवा सुरळीत राहावी यासाठी तात्पुरते टॉवर उभारण्याबाबत सूचना करण्यात आल्या.
यात्रेदरम्यान वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी वीज वितरण अधिकाऱ्यांना विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. दुकानांना स्वतंत्र वीजजोडणी देण्यात यावी व एका दुकानातून दुसऱ्या दुकानात वीज जोडणी देऊ नये, अशी स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. यावर वीज अधिकाऱ्यांकडून पोल उभारणीचे काम सुरू असून, सर्व दुकानांना स्वतंत्र जोडणी दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
यावेळी आंगणे ग्रामस्थांनी यात्रेदरम्यान पाणी, वीज व नेटवर्क सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाला यात्रेसाठी दोन टँकर उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले. तसेच यात्रेच्या काळात बीएसएनएलने नेटवर्क सुरळीत ठेवावे व जिओ कंपनीने तात्पुरता टॉवर उभारावा, अशा सूचना देण्यात आल्या.
वाहतुकीच्या दृष्टीने कणकवली बाजूला असलेल्या एसटी बस तळाजवळ खासगी वाहनांचे पार्किंग व ये-जा यासाठी एकच मार्ग असल्याने अडचणी निर्माण होतात. यासाठी यात्रेच्या काळात मिनी बस सेवा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. यात्रेत प्लास्टिकचा कमीत कमी वापर करून प्लास्टिकमुक्त यात्रा राबवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने यात्रेदरम्यान राजकीय किंवा इतर शुभेच्छा बॅनर लावण्याबाबत प्रश्न उपस्थित झाला. याबाबत पुढील चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
महसूल विभागाच्या तयारीबाबत प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी माहिती देताना सांगितले की, विविध दक्षता पथके स्थापन करण्यात आली असून यात्रेपूर्वी आपत्कालीन व्यवस्थेची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. दोन मंडळ अधिकारी, सहा तलाठी व तीन शिफ्टमध्ये नायब तहसीलदारांचे पथक कार्यरत राहणार आहे. आंगणे कुटुंबीय गर्दी नियंत्रण उत्तम प्रकारे करतात, त्यामुळे जत्रा यशस्वी होते, असे निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी नमूद केले.
भाविकांना नऊ दर्शन रांगांमधून दर्शन मिळणार असून अपंग व मान्यवरांसाठी स्वतंत्र रांग ठेवण्यात येणार आहे. मुखदर्शनासाठीही वेगळी रांग असणार असल्याची माहिती भास्कर आंगणे यांनी दिली. अपंग भाविकांसाठी कणकवली व मालवण स्टँड येथून रिक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर व परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम, परिवहन अधिकारी श्री. काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, बीडीओ श्याम चव्हाण, डीवायएसपी घनशाम आढाव, तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, वीज वितरणचे सहाय्यक अभियंता, एसटीचे विभागीय नियंत्रक, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, बाबू आंगणे, बाळा आंगणे यांच्यासह विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी व आंगणे ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







